डोंबिवलीतील मॉडेल महाविद्यालयाच्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांची अनोखी ‘दिवाळी सहल’
सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांची साथ न सोडता भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांनी त्याच काळात भारतीयांना करमुक्त मिठाचा हक्क मिळवून दिला. गांधीजींनी साबरमती ते दांडी असा ३९० किमीचा प्रवास पायी करून मिठावरील ब्रिटिशांची मक्तेदारी मोडून काढली. सुरुवातील केवळ ७८ जणांसह सुरू झालेली ही दांडीयात्रा जेव्हा दांडीला पोहोचली तेव्हा गांधीजींच्या मागे हजारोंचा समुदाय होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाची घटना असलेल्या या आंदोलनाला भारतीय संस्कृती, भाषा आणि जीवनमानाच्या एकत्रीकरणाचीही बाजू होती. हाच अनुभव घेण्यासाठी डोंबिवलीतील मॉडेल महाविद्यालयाचे दोन प्राध्यापक आणि नऊ विद्यार्थ्यांनी साबरमती ते दांडी असा पायी प्रवास केला. दिवाळीच्या सुटीचे निमित्त साधून सुरू झालेली ही आधुनिक ‘दांडीयात्रा’ १० नोव्हेंबर रोजी सुफळ संपूर्ण झाली.
१२ मार्च ते ६ एप्रिल १९३० या कालावधीत झालेली दांडीयात्रा केवळ मिठासारख्या दैनंदिन आहारातील अविभाज्य घटकासाठी भारतीयांनी दिलेला लढाच नव्हता तर स्वातंत्र्य चळवळीला मोठे बळ मिळवून देणाऱ्या असहकार आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा होता. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून ओळख असलेल्या ‘दांडीयात्रे’चा अनुभव महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने मॉडेल महाविद्यालयातील प्राध्यापक के.एस.अय्यर यांनी साबरमती ते दांडी असा पायी प्रवास करण्याची योजना आखली होती. त्यानुसार ३१ऑक्टोबर रोजी अय्यर आणि प्रा. ओमप्रकाश सुखमलानी यांच्या नेतृत्वाखाली सात विद्यार्थी या ‘यात्रे’वर निघाले. साबरमती आश्रमातून निघाल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी दांडी येथील गांधी स्मारकापर्यंत पोहोचेपर्यंत या नऊ जणांनी संपूर्ण प्रवास पायी पूर्ण केला. वाटेत येणाऱ्या गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधत, त्या ऐतिहासिक घटनेच्या गावांगावांतील खुणा बघत या नऊ जणांनी दांडी गाठले. ‘आमच्या या उपक्रमाबद्दल समजताच अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडून आम्हाला जेवणाचे आपल्या घरी पाहुणचार घेण्याचे निमंत्रण मिळाले. गांधीजींवरील प्रेमाचे आणि भारतीय आदरातिथ्याचे दर्शन या यात्रेच्या निमित्ताने अनुभवता आले,’ असे यज्ञेश शिंदे हा विद्यार्थी म्हणाला.
संस्मरणीय दांडीयात्रा
गणेशोत्सवाच्या काळापासूनच या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने तयारी केली होती. गांधीजींचा प्रवास पुन्हा एकदा अनुभवण्याबरोबर या ऐतिहासिक घटनेचा नव्याने उलगडा करण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने केला. कोणत्याही बाह्य़साधनांची मदत न घेता केवळ दिवसभर ३० किमी चालण्याचा संकल्प या विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामुळेच ही यात्रा १० दिवसांमध्ये पूर्ण झाली.
