scorecardresearch

ठाणे : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादनावर परिणाम, जांभूळही धोक्यात; फळबागा, भाजीपाल्यांचे नुकसान

गुरुवारी सकाळी आणि रात्री झालेल्या जोरदार पावसाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, कल्याण तालुका तसेच इतर भागांतील सुमारे ९० टक्के आंबा पिक धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Unseasonal rains affect mango thane
ठाणे : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादनावर परिणाम, जांभूळही धोक्यात (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

बदलापूर : निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ आणि करोनाच्या टाळेबंदीमुळे आधीच संकटात सापडलेल्या ठाणे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना यंदाच्या वर्षीही अवकाळी पावसाने रडवले आहे. गुरुवारी सकाळी आणि रात्री झालेल्या जोरदार पावसाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, कल्याण तालुका तसेच इतर भागांतील सुमारे ९० टक्के आंबा पिक धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सोबतच चिकू, जांभूळ, कोकम, पेरू या फळांनाही काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. भाजीपाल्याचेही या पावसात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

कृषी विभागाच्या मदतीने गेल्या काही वर्षांत ठाणे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवडीला सुरुवात केली आहे. योग्य दर, नजीक असलेली बाजारपेठ या कारणांमुळे फळबागा लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यातच आंबा फळाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होते आहे. हापूस, केशर, नीलम यासारख्या अनेक आंब्याच्या जातींना बाजारात चांगली मागणी असते. मात्र गेल्या तीन वर्षांत चक्रीवादळ आणि करोना टाळेबंदीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यातच गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, कल्याण यांसारख्या तालुक्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः जोडपून काढले. गुरुवारी सकाळी पावसाने थोडी हजेरी लावली. मात्र सायंकाळी तुफान पावसाने फळ बागांना मोठा फटका बसला. या पावसात आंब्याचा बहुतांश मोहोर गळून पडला. काही बागांमध्ये केशर आंबा चांगला वाढला होता. तोही गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर हापूस आणि इतर जातीच्या आंब्यांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षात आंब्याला उशिरा मोहोर आला होता. मात्र मोहोर चांगला आल्याने यंदा चांगले उत्पन्न हाती येईल अशी आशा होती. मात्र एकाच दिवसात दोनदा झालेल्या पावसाने पूर्ण आंबा बागाचे नुकसान झाल्याची माहिती मुरबाडचे नत्थू पारधी यांनी दिली आहे.

हेही वाचा – ठाण्यात आढळले इन्फ्ल्युएंझाचे सहा रुग्ण; आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या आयुक्तांच्या सूचना

कृषी पर्यटन केंद्रांना फटका

गेल्या काही वर्षांत अंबरनाथ तालुक्यात कृषी पर्यटन केंद्रात आंबा, जांभूळ, चिकू, पेरू यांसारख्या फळांची पर्यटक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याने कृषी पर्यटक केंद्रांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. मात्र यंदाच्या वर्षात या उत्पन्नावर पाणी फिरले आहे. पण तरीही त्या बागा राखाव्या लागणार असून आर्थिक नुकसान वाढेल, अशी माहिती वांगणी येथील देशमुख फार्मचे दिलीप देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा – करोना चाचण्या वाढविण्याबरोबरच उपाययोजना करा; ठाणे महापालिका आयुक्तांच्या आरोग्य विभागाला बैठकीत सूचना

गुरुवारच्या पावसाने फळबागा आणि रबी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची माहिती घेणे सुरू असून विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 19:16 IST