डोंबिवली : कल्याण शिळफाटा सिमेंट रस्त्यावर पहिल्याच मुसळधार अवकाळी पावसाने खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. या खड्डयांमुळे वाहने संथगतीने धावत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. मालवाहू अवजड वाहने या खड्ड्यांमुळे हळूहळू धावतात. ही खड्ड्यांची परिस्थिती शिळफाटा रस्त्यावर कायम राहिली तर या रस्त्यावरील वाहतूक कोंडीची परिस्थिती गंभीर होईल, अशी माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

शिळफाटा रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे तातडीने हाती घेण्यात यावीत, अशी मागणी कोळसेवाडी वाहतूक विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून वाहतूक विभागाला प्रतिसाद दिला जात नाही. या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे खड्डे वाहतूक पोलीस, वाहतूक सेवकांनी माती, खडी, विटांनी भरले होते. सतत वाहनांची धाव असल्याने भरलेले खड्डे दोन दिवसात उखडले आहेत. पाऊस पडला की या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. खड्ड्यातील साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने वेगात असलेले दुचाकी स्वार या खड्ड्यात जोरात आदळून पडतात. अवजड वाहने संथगतीने चालविली जात असल्याने त्यांच्या मागे वाहनांच्या रांगा लागतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.
रिजन्सी अनंतम समोरील शिळफाटा रस्त्यावर भूमिगत जलवाहिन्यांची गळती सुरू असते. या तुंबलेल्या पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहने संथगती धावत असल्याने या चौकात सतत कोंडी होते.

भरपाईचा परिणाम

गोळवली ते खिडकाळी, देसई गावापर्यंत शिळफाटा रस्ता रुंदीकरण आणि सीमेंट काँक्रीटकरण कामासाठी सुमारे शंभरहून अधिक शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. शासनाने बाधित शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षी सुमारे ३०० कोटीहून अधिक रकमेची भरपाई जाहीर केली आहे. ही रक्कम वर्ष उलटले तरी एमएसआरडीसीकडून शिळफाटा बाधित शेतकऱ्यांना दिली नाही. भरपाई नाही तोपर्यंत रस्त्यासाठी एक इंच जमीन मिळणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महामंडळाला या भागात सीमापट्ट्यांची कामे करता आली नाहीत.

सीमापट्ट्या नसल्याने तीन मार्गिकांमधील वाहने अचानक दोन मार्गिकांमध्ये येऊन कोंडी होत आहे. काही निर्माणाधीन गृहप्रकल्पांनी शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीचा आपल्या प्रकल्प बांधकामाला त्रास नको म्हणून रस्त्यापासून सहा फुटापर्यंत लाद्या लावून रस्ते मार्गात अडथळे उभे केले आहेत. एक्सपेरिया माॅलजवळील पूल खुला झाल्यानंतर काटई बदलापूर जंक्शन परिसरात अरूंद रस्त्यामुळे कोंडीचे प्रमाण अधिक वाढणार आहे, असे वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले. अधिक माहितीसाठी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांना सतत संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

खड्डे ठिकाणे

सुयोग हाॅटेल, मानपाडा पेट्रोलपंप, उंबार्ली रस्ता, ठाकूर कम्पाऊंड, तनिष्का बार. सोनारपाडा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिळफाटा रस्त्यावरील खड्डे मुसळधार पाऊस सुरू होण्यापूर्वीच बुजविणे आवश्यक आहेत. दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शिळफाटा जागोजागी वाहन कोंडीत अडकत आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी एमएसआरडीसी, स्थानिक प्रशासनाला कळविले आहे. कोणीही दखल घेत नाही. वाहतूक पोलीस माती टाकून खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम करत आहेत. सचिन सांडभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोळसेवाडी वाहतूक.