ठाणे – मे महिना म्हटलं की लग्नसराईचा हंगाम. घरासमोर मांडव, उत्साहाचे वातावरण आणि नटलेले वधू वर. मात्र यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे या आनंदावर विरझण घातले. त्यामुळे ऐन लग्नात अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तर पुढील मुहुर्तावर लॉन्सवर होणारी लग्न रद्द करून अनेकांना ऐनवेळी बंदिस्त हॉल शोधावे लागत आहेत. यामुळे मंडप व्यवस्थापन, स्वागत सजावट करणारे, जेवणाचे व्यवस्थापक, छायाचित्रकारांना नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
साधारणत: एप्रिल मे महिने म्हणजे लग्नसराईचा कालावधी मानला जातो. दिवाळीनंतर विवाहसोहळ्यांना सुरुवात होत असते. एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे दरवर्षी होत असतात. यामध्ये विवाह सोहळ्याला नवनवीन कार्यक्रमांमुळे आनंदाचा रंग चढतो. वधु वरांसाठी महत्वाचा दिवस असल्याने त्याकरिता काही दिवस आधीपासुनच नियोजन सुरु असते. यामध्ये सांगितिक कार्यक्रम, जेवण, लग्नाचे ठिकाण, वधुवरांच्या स्वागतासाठी सजावट, मांडव, अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी छायाचित्र अशा विविध गोष्टींचे आयोजन आखले जाते.
मात्र, अशा विविध गोष्टींचे नियोजन करून देखील यंदा मे महिन्यात अवेळी आलेल्या पावसाने आनंदाच्या दिवसांवर पाणी फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत आहे. अनेकांचे विवाहसोहळे सुरू असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर, अनेक विवाहसोहळे हे सायंकाळच्यावेळी लॉन्सवर केले जातात. अचानक आलेल्या पावसामुळे लॉन्सवर होणारी लग्न रद्द करून अनेकांना ऐनवेळी बंदिस्त हॉल शोधावे लागत असल्याचेही समोर आले आहे.
आनंदाच्या क्षणावर पावसाचे पाणी
हल्लीच्या काळात विवाहसोहळे मोठ्या धुमधडाक्यात करण्याकडे नागरिकांचा कल दिसुन येतो. यामध्ये सायंकाळच्यावेळी लॉन्सवर लग्न, जेवणासाठी विविध पदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी, वधुवरांचे स्वागत असा ट्रेंड दिसुन येतो. मात्र अवकाळी पावसामुळे नवविवाहित जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचण सामोरे जावे लागत आहे. ओपन लॉन्सवरील लग्नांना आता बंदिस्त हॉल्स शोधावे लागत आहेत.
मे महिन्यात लग्नांचे मुहूर्त मोठ्या प्रमाणात असून अनेक लग्नसराईंचे आयोजन लॉन्सवर करण्यात आले होते. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लॉन्सवरील लग्न रद्द केले जात आहेत. ही लग्न ऐनवेळी बंदिस्त हॉलमध्ये ठेवली जात आहेत. त्यामुळे स्वागतासाठी तसेच लग्नाच्या दरम्यान केली जाणारी फटाक्यांच्या आतषबाजीची तसेच स्वागतासाठी केली जाणाऱ्या सजावटीच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या. ऑर्डर रद्द झाल्याने ७० टक्के नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. – नितेश भोईर, सजावट करणारे
मे महिना हा लग्न सराईचा महिना असून अनेकजण या कालावधीत लॉन्सवर लग्न आयोजित करतात. मला अशाच एका लग्नाची आगाऊ नोंदणी होती. परंतू, पावसामुळे लॉन्सवर लग्न केल्यास नुकसान होईल अशी भीती वधु-वरांच्या कुटूंबामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी ते बंदिस्त सभागृह शोधत आहेत. जर हे सभागृह मिळाले नाही तर, लग्नाची तारिख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमुळे आमची ऑर्डर रद्द झाल्यास आमचे एक दिवसाचे आर्थिक नुकसान होणार आहे. – निखील जाधव, फोटो आणि व्हिडीओग्राफर
अवेळी आलेल्या पावसामुळे मांडव बांधण्यासाठी असणारे बांबु पावसाच्या पाण्याने भिजले आहेत. अनेक लग्न ही पुढील मुहुर्तावर होणार आहेत. तर लॉनवरील लग्नासाठी नागरिक आग्रही नाहीत. – मनिष मुंद्रा, मांडव व्यवस्थापक