अंबरनाथ : अंबरनाथ येथील चिखलोली धरणात पुन्हा एकदा रसायनयुक्त पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. धरणालगत असलेल्या जांभिवली आणि ठाकूरपाडा परिसरातील एका रासायनिक कंपनीतून फेसयुक्त, दुर्गंधीयुक्त पाणी थेट धरणात मिसळले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे धरणातील शेकडो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसले असून, हेच पाणी जलशुद्धीकरणानंतर अंबरनाथ पूर्वेतील सुमारे ५० हजार नागरिकांच्या घरात पोहोचत आहे, हे अधिक चिंताजनक ठरत आहे.
अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसीला लागून असलेले चिखलोली धरण हे स्थानिकांसाठी पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. परंतु, धरण परिसरात अनेक रासायनिक कंपन्यांचे अतिक्रमण वाढले असून, पर्यावरणीय नियमांचा बोजवारा उडालेला आहे. यापूर्वीही धरण परिसरात रसायनांच्या गोण्या फेकणे, रसायनयुक्त पाणी सोडणे असे प्रकार उघड झाले होते. यावेळी मात्र रसायनांचा तवंग स्पष्ट दिसत असून, धरणातील पाणी धोकादायक रसायनांनी दूषित झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की, संबंधित कंपनीला एका बड्या राजकीय नेत्याचा पाठिंबा असल्यामुळे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. “अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळ सुरू असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि आमा संघटना याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
आमा संघटनेची प्रतिक्रिया
“धरण परिसराची पाहणी करून संबंधित कंपनीविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली जाईल. तसेच, कंपनीचे काम तात्काळ बंद करण्यासाठी आम्ही दबाव आणणार आहोत,” — उमेश तायडे, अध्यक्ष, आमा संघटना
प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणते की “धरणातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, अहवाल आल्यानंतर दोषी कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,” — जयंत हजारे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
यापूर्वीही प्रदूषणाचे प्रताप
काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे नैसर्गिक जलस्त्रोत आणि धरण परिसरात रासायनिक सांडपाणी सोडल्याचे दिसून आले होते. वालधुनी नदी पात्रात यापूर्वीही रासायनिक सांडपाणी सोडल्याचा इतिहास आहे. यावर ठोस कारवाई होत नसल्याने कंपन्या कारवाईला धजावत नाही. त्यामुळे असे प्रकार सुरूच आहेत.