ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदार संघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून त्यापाठोपाठ आता महायुतीतील भाजपने राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण केले आहे. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत असून या गीताच्या निमित्ताने भाजपने प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी गेल्या काही दिवसांपासून मेळाव्यांच्या माध्यमातून निष्ठावान विरुद्ध गद्दार असा प्रचार सुरू केला असून त्याचबरोबर विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्रौत्सवात राम मंदीराचा देखावा उभारण्यात आला होता. या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुक काळात राममंदीराचा उल्लेख करणाऱ्या भाजपला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यातच आता भाजपनेही राम नवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचे अनावरण करत प्रचाराचे शंख फुकल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई

प्रभु श्रीराम गर्जना या गीताचे गीतकार आणि संगीतकार प्रकाश बोर्डे आहेत. या गीताचे गायक गणेश खांडके हे आहेत. ठाणे येथील रोहन रेकॉर्डींग स्टुडिओ यांचे संगीत संयोजन आहे. भाजपचे ठाण्यातील पदाधिकारी महेश कदम यांचे गीतासाठी विशेष सहकार्य लाभले आहे. कार सेवक असलेले भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गीताचे अनावरण करण्यात आले आहे. प्रभु रामंचद्रांनी रामराज्याची कल्पना आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्येत राम मंदीर उभारून एकप्रकारे देशात रामराज्य आणण्याचा संदेश दिला आहे. राम राज्य म्हणजे गरिबांची सेवा, सुशासन, विकास, अशी प्रतिक्रिया आमदार केळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

काय आहे गीत

श्वासा श्वासात राम, ध्यासाध्यासात राम, नसानसात राम, रक्तारक्तात राम, या हद्यात रामगर्जना…तुम्ही आम्ही मिळून करू राम वंदना. निष्ठेने वागा, दिली शिकवण प्रभु श्रीरामांनी. मर्यादा पुरुषोत्तम तुम्ही आर्दश आमच्यासाठी. नाही जगात तोड, श्रीराम बोल. प्रभु श्रीराम आमचा कणा, असे हे गीत आहे.