ठाणे: उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी पथकाने भिवंडीतील तीन तरुणांना अटक केली आहे. गाझा युद्धग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांनी निधी गोळा केला होता. या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केल्याचे कळते आहे.

संशयित मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२३), अबू सुफियान तजमु्लुल अन्सारी (२२) आणि जैद नोटयार अब्दुल कादिर (२२) अशी त्यांची नावे असून उत्तर प्रदेश एटीएसने भिवंडीतील शांतीनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.

तिघांवर आरोप काय?

– या तिघांनी समाजमाध्यमांवर एक मोहीम सुरु केली होती. गाझा येथील संघर्षामुळे प्रभावित झालेल्या पिडीतांसाठी आर्थिक मदत मागण्यासाठी त्यांनी भावनिक चित्रीकरण प्रसारित केले होते. तिघांनी या मोहीमेद्वारे लाखो रुपये गोळा केले होते. परंतु रकमेची मदत गाझा येथील लोकांना पाठविण्याऐवजी त्याचा वापर बेकायदेशीरकृत्यांसाठी करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे.

असा केला निधीचा वापर

– तिघांनी त्यांच्या युपीआय खाते आणि बँक खात्याचा वापर करन देणग्या गोळा केल्या. उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांतून लाखो रुपयांच्या देणग्या गोळा झाल्या होत्या. उत्तर प्रदेश एटीएस हे पैसे कसे, कोणत्या ठिकाणी वळविण्यात आले याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

भिवंडी नेहमी चर्चेत

भिवंडीत अनेकदा महाराष्ट्र एटीएस, केंद्रीय तपास यंत्रणांनी दहशतवादाच्या संशयातून अनेक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे भिवंडी हे शहर नेहमी चर्चेत राहत असते.