‘आरटीओ’कडून कल्याण, डोंबिवली स्थानक परिसरात आधुनिक वाहने तैनात

भगवान मंडलिक
कल्याण : कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात अनावश्यक गर्दी करून वाहतूक कोंडी करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालक तसेच नियम मोडणाऱ्या दुचाकीचालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने या भागात अद्ययावत वाहने तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकाने वाहतुकीचा नियम मोडला, बेशिस्तपणा करताच या वाहनातील यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने कृतिशील होऊन चालकाला दंड ठोठावण्याची प्रक्रिया पार पडेल, अशी व्यवस्था आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते वाहतूक मार्गातील बेशिस्तीला लगाम लावण्यासाठी शासनाने राज्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागांना ७६ अद्ययावत वाहने (इंटरसेप्टर) वाहने बुधवारी उपलब्ध करून दिली. यामधील एक वाहन कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाला मिळाले आहे. स्कॉर्पिओ वाहनामध्ये वाहनचालकाची चाचणी, वाहनांची तपासणी, वायुवेग (स्पीड गन), मद्यपान केल्याची चाचणी करणारी यंत्रणा, रस्ते अपघात, जीवितहानी रोखणारी, नियमाचे    उल्लंघन केल्यानंतरची ई-चलान स्वयंचलित अद्ययावत यंत्रणा बसविण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या यंत्रणेचे नियमन करणार आहेत, अशी माहिती कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तुकाराम चव्हाण यांनी दिली. या चाचणी यंत्रणेमुळे वाहनचालकावर तात्काळ दंडात्मक आणि वैद्यकीय तपासणी करणे तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.

कल्याण, डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात रिक्षाचालक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. वाहनतळ सोडून रिक्षाचालक भर रस्त्यात प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा होतो. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसर नेहमी रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहनकोंडीने गजबजलेला असतो. त्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या अद्ययावत वाहनाच्या माध्यमातून केला जाणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागातही या वाहनांद्वारे महिन्यातील वार निश्चित करून त्या भागातील वाहनांची तपासणी केली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण ‘आरटीओ’ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सुरुवातीला या वाहनावर चक्राकार पद्धतीने काम करतील. जसे अधिकारी उपलब्ध होतील तसे या वाहनाची गस्त आखण्यात आली आहे.

कल्याण ‘आरटीओ’कडील अद्ययावत वाहन तपासणी वाहनाचा उपयोग कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागांतील रिक्षाचालक, दुचाकीस्वारांची तपासणी करण्यासाठी प्राधान्याने करण्यात येणार आहे. उपलब्ध अधिकारी यांच्या साहाय्याने हे वाहन गस्तीसाठी पाठविण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून ‘आरटीओ’तील प्रशिक्षणासाठी गेलेले अधिकारी परतले की हे वाहन २४ तास वाहन तपासणीसाठी कार्यरत राहील. शहरातील वाहनचालकांच्या बेशिस्तीला आवर घालणे या वाहनाच्या माध्यमातून शक्य होणार आहे.

– तुकाराम चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Updated look at unruly drivers ssh
First published on: 03-09-2021 at 01:08 IST