डोंबिवली – डोंबिवलीत पालिकेच्या ग आणि फ प्रभागाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असून त्यात फेरिवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात येत आहे. यामुळे फेरिवाले महावितरणच्या फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीतील रोहित्राच्या संरक्षित जागेत साहित्य लपवून ठेवत आहेत.

महावितरणने रस्त्याच्या कडेच्या, सोसायटींच्या बाजूला असलेल्या रोहित्रांना आकर्षक पद्धतीने संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. यामुळे यापूर्वी उघड्यावर असलेली रोहित्रे आता संरक्षित झाली आहेत. अशा संरक्षित रोहित्रांचा वापर डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीतील फेरीवाले आपले साहित्य लपवून ठेवण्यासाठी करत आहेत. या रोहित्राच्या संरक्षित जाळ्यांच्या आतील भागात जाण्यासाठी एक दरवाजा बसविण्यात आलेला आहे. या दरवाजाच्या कडीकुलपाची चावी फेरीवाल्यांच्या ताब्यात आहे. महावितरण नियंत्रक असलेल्या रोहित्राची चावी फेरीवाल्यांना कोणी दिली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. फडके रोड, चिमणी गल्ली भागातील फेरीवाले रात्री बाजार आटोपल्यावर आपले सर्व साहित्य रोहित्राच्या संरक्षित जाळ्यांमध्ये कडीकुलपात बंदिस्त करून ठेवतात.

हेही वाचा – ठाण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

रोहित्राच्या ठिकाणी आगीची घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची असेल, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. रोहित्राच्या जागेचा नियमबाह्य वापर करणाऱ्या फेरीवाल्यांवर महावितरण अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी फडके रस्ता भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या रोहित्राच्या आतील भागात सामान ठेवण्यासाठी फेरीवाल्यांचे नेते इतर फेरीवाल्यांकडून दरमहा शुल्क आकारात असल्याच्या तक्रारी आहे. पालिकेच्या फ प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. पालिकेने रोहित्राच्या आतील भागात सामान ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आतापर्यंत इमारतीचे आडोसे, गल्लीबोळात साहित्य लपून ठेवणाऱ्या फेरीवाल्यांनी रोहित्रांच्या संरक्षित जाळ्या वापरण्यास सुरुवात केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर पडून पाच प्रवासी किरकोळ जखमी, अति जलद कसारा लोकलमधील प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रोहित्रामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या आजुबाजूला संरक्षित जाळ्या बसविल्या जात आहेत. अशाच पद्धतीने फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीतील वर्दळीच्या आणि बाजारपेठेतील रोहित्राला महावितरणने संरक्षित जाळी बसवली आहे. त्या ठिकाणचा वापर जर फेरीवाले नियमबाह्य करत असतील तर संबंधित फेरीवाल्यांवर महावितरणकडून तातडीने कारवाई केली जाईल,” असे महावितरणच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.