कल्याण – मध्य रेल्वेच्या भायखळा रेल्वे स्थानकात प्रवाशांना दिशादर्शक असलेल्या बहुतांशी पाट्या हिंदी आणि इंग्रजीत होत्या. दिवा येथील मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्याने यासंदर्भात मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे मराठी भाषक प्रवाशांच्या सोयीसाठी आणि घटनात्मक हक्कांची अंमलबजावणी व्हावी म्हणून भायखळा रेल्वे स्थानकात प्रवाशांना दिशादर्शक असलेल्या मराठी पाट्यांचाही वापर करण्याची मागणी करण्यात आली होती. चार महिन्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन भायखळा रेल्वे स्थानकात हिंदी, इंग्रजी भाषांबरोबर मराठीचाही उल्लेख असलेल्या पाट्या स्थानकात लावल्या आहेत, अशी माहिती दिवा येथील मराठी एकीकरण समितीचे राज्य उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रत्येक ठिकाणी प्रभावी वापर झाला पाहिजे यासाठी मराठी एकीकरण समिती कार्यरत आहे. समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी विविध भागात फिरत असताना त्यांना मराठी भाषेची तेथे उणीव जाणवली तर तेथे ते मराठी भाषेचा प्रभावी वापर झाला पाहिजे यासाठी आग्रही असतात. मध्य, पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांमध्ये हिंदी, इंग्रजी बरोबर मराठी भाषेत प्रवाशांना दिशा दाखविणाऱ्या पाट्या आहेत.
भायखळा रेल्वे स्थानकातून प्रवास करत असताना मराठी भाषा एकीकरण समितीचे राज्य उपाध्यक्ष आनंदा पाटील यांंना भायखळा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना दिशादर्शक असलेल्या पाट्यांवर आरपीएफ, स्टेशन मॅनेजर, बुकिंग ऑफिस, इन्सपेक्टर, रिझर्व्हेशेन सेेंटर, कॅन्टिन अशी अनेक इंग्रजी, हिंदी भाषेतील नावे आढळून आली. या पाट्यांंवर कोठेही मराठी भाषेचा उल्लेख नव्हता. आरक्षण केंद्रातील तिकीट काढण्याचा अर्ज फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत होता. हा अर्ज प्रवाशांना मराठी टंकलिखित पध्दतीने उपलब्ध झाला पाहिजे, अशी समितीची मागणी होती.
उपाध्यक्ष पाटील यांनी भायखळा रेल्वे स्थानकातील पाट्या जशा हिंदी, इंग्रजी भाषेत आहेत, त्याप्रमाणे तेथे मराठीचाही प्रभावी वापर झाला पाहिजे अशी मागणी करत गेल्या एप्रिलमध्ये मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे मागणी केली. या अर्जाची रेल्वेच्या वरिष्ठांकडून दखल घेतली जात नव्हती. मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने रेल्वेकडे पुन्हा दाद मागितली. रेल्वेच्या वरिष्ठांनी या तक्रारीची दखल घेतली. भायखळा रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात मराठीतून आरक्षण तिकीट काढण्याचा अर्ज उपलब्ध करून दिला. त्याच बरोबर दोन दिवसापूर्वी उपाध्यक्ष आनंदा पाटील यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत भायखळा रेल्वे स्थानकातील प्रवासी दिशीदर्शक सर्व पाट्या मराठीतून करत असल्याचे कळविले. त्याप्रमाणे भायखळा रेल्वे स्थानकात आता हिंदी, इंग्रजी भाषेबरोबर मराठीतूनही पाट्या झळकू लागल्या आहेत, असे उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
आपण केवळ तक्रारीचा पाठपुरावा करत नव्हतो तर मराठी भाषेलाही तेवढेचे मानाचे स्थान आता मिळालेच पाहिजे यासाठी सुरू ठेवलेला लढा आहे. स्थानिक अधिकृत भाषा म्हणून आता मराठीलाही तेवढाच मान मिळाला पाहिजे. मराठी भाषेच्या आग्रहाचा हा संघर्ष यापुढे सुरूच राहणार आहे.- आनंदा पाटील,उपाध्यक्ष, मराठी एकीकरण समिती. दिवा.