ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पशुपालक, गोपालक आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. २० व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात नोंदणीकृत १,७२,०४३ जनावरांचे लाळ-खुरकूत आजारापासून संरक्षण करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार तसेच प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई डॉ. प्रशांत कांबळे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरु झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लाळ-खुरकूत रोग प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांना आपल्या जनावरांचे लसीकरण करण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून ही सुविधा घेता येणार आहे. या मोहिमेचा उद्देश जनावरांना रोगमुक्त ठेवणे, त्यांची उत्पादनक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मार्फत देण्यात आली.

या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले की,“ही लस ३ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या सर्व निरोगी वासरे, बैल, रेडे, गायी-म्हशी तसेच गाभण जनावरांना देता येते. त्यामुळे पशुपालकांनी अजिबात विलंब करु नये आणि आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. रोग प्रतिबंधक उपाययोजना राबविणे ही केवळ शासकीय जबाबदारी नसून सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे.” तसेच शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल आणि ठाणे जिल्ह्यातील पशुधन अधिक निरोगी व सक्षम बनेल. एकत्रित प्रयत्नांमुळे ठाणे जिल्हा रोगमुक्त आणि आरोग्यदायी पशुधन असलेला आदर्श जिल्हा ठरेल, असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला.

लाळ-खुरकूत म्हणजे नेमका कोणता आजार?

लाळ-खुरकूत (Foot and Mouth Disease – FMD) ही जनावरांमध्ये वेगाने पसरणारी संसर्गजन्य व्याधी आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी जनावरांना दर सहा महिन्यांनी लाळ-खुरकूत प्रतिबंधक लस टोचली जाते. ही लस गायी, म्हशी, मेंढ्या, बकऱ्या आणि डुकरांना दिली जाते. लसीकरणामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादन वाढते आणि रोगाचा प्रसार थांबतो. भारत सरकार ‘राष्ट्रीय लाळ-खुरकूत नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत मोफत लसीकरण मोहीम राबवते. शेतकऱ्यांनी वेळेवर लसीकरण करून जनावरांचे संरक्षण करावे. योग्य लसीकरण हा रोग टाळण्याचा प्रभावी उपाय आहे.