बदलापूरः बदलापुरातून जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर ते वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनात मिळालेली आदिवासी बांधवांची रक्कम काही जणांनी त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत परस्पर वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहा जणांचे एकूण ७४ लाख ५० हजार रूपये वळवण्यात आले असून याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही राजकीय व्यक्तींचाही सहभाग असून त्यातील काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जवाहरलाल नेहरू बंदरातून होणारी वाहतूक शहरातून होत असल्याने त्याचा वाहतूक कोंडीला मोठा फटका बसतो. त्यामुळे अशा वाहतुकीसाठी जवाहरलाल नेहरू बंदर ते वडोदरा असा थेट महामार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अंबरनाथ तालु्क्यातील विविध गावांमधून हा महामार्ग जातो. अंबरनाथ तालुक्यात या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गाच्या भूसंपादनावेळी स्थानिक जमीन मालकांनी चांगला दर पदरात पाडून घेतला. त्यामुळे आदिवासी बांधवांनाही चांगला मोबदला मिळाला. या मोबदल्याची रक्कम काही वर्षांपूर्वी आदिवासी बांधवांच्या खात्यात जमा झाली. मात्र या आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही खात्यांमधून विविध खात्यांमध्ये रक्कम वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीजाबाई दिवेकर यांच्या तक्रारीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम खबर अहवालानुसार जीजाबाई दिवेकर वारस असलेली जागा वडोदरा महामार्गाच्या कामी संपादित करण्यात आली. त्यांची जागा ज्याच्या नावे आहे त्यांच्या खात्यात त्यासाठी ५ कोटी ७७ लाख रूपये जमा झाले होते. त्यानंतर खातेदार नातेवाईकाने दहा वारसांच्या खात्यात ठराविक रक्कम वळती केली. मात्र दिवेकर यांच्या परिचयाचे असलेल्या संजय गिरी नामक व्यक्तीने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने बँकेच्या पावत्यांवर अंगठ्याचे ठसे घेतले. त्या बदल्यात १ लाख रूपये दिले. मात्र काही दिवसांनी ९ लाख रूपये खात्यातून भलत्याच खात्यात वळते झाल्याचा आरोप तक्रारदार दिवेकर यांनी केला आहे. संजय गिरी, श्री कृष्ण इंटरप्रायेजस, साईनाथ दिलीप भारती, गणेश कार्स अ.डी.एफ, रेखा संतोष चौगुले, समीर वेहाळे, अनंता अचीव्हर्स अँकेडमी अशा आरोपींच्या यादीत समावेश आहे. या काही खात्यांवर दहा जणांचे ७४ लाख ५० हजार रूपये वळते झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश

या प्रकरणात कुळगाव पोलिसांनी काही जणांना अटक केल्याची माहिती मिळते आहे. यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. भूसंपादनावेळी अनेक दलाल या प्रक्रियेत सक्रीय होते. त्यांच्या मदतीने कागदपत्रांची पूर्तता करण्यास मदत झाली मात्री काही जणांनी त्या बदल्यात मोबदल्याचे पैसे घेतल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामुळे आणखी काही जण यात उघड होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुशिवलीच्या घोटाळ्याची आठवण

काही वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या भूसंपादनात अशाच प्रकारे मोबदला लाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यात उपविभागीय कार्यालयात काम करणारे आजी माजी कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणात डझनभर आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. आता वडोदरा महामार्ग भूसंपादनात अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, असाही संशय व्यक्त होतो आहे.