ठाण्यातील गडकरी रंगायतन मार्गावर शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी शिवसेनेत फूट पडल्याने याठिकाणी उत्सव साजरा करण्याची परवानगी शिंदे गटाला मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने गडकरी रंगायतन चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या दोन्ही गटांकडून तरूणांना डीजेवर गाणी वाजवून आकर्षित करण्यात येत आहे. दोन्हीकडे तरूण-तरूंणींची गर्दी उसळली आहे.
ठाण्याचे खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून त्यांच्याकडून गडकरी रंगायतन मार्गावरील राजवंत ज्वेलर्स दुकानासमोर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते. ठाणे तसेच आसपासच्या शहरांतून तरूण तरूणी या ठिकाणी गर्दी करत असतात. शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथे शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये चूरस लागली होती. परंतु याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यास शिंदे गटास परवानगी मिळालेली होती. त्यानंतर राजन विचारे यांनी गडकरी रंगायतन चौकात परवानगी मिळवली. त्यामुळे एकाच रस्त्यावर ठाकरे आणि शिंदे गटाचे अवघ्या काही मीटर अंतरावर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन्ही गटाकडून मोठ्या आवाजात डीजेवर गाणी वाजवली जात आहे. त्यामुळे तरूण- तरूणींची मोठी गर्दी या दोन्ही कार्यक्रम ठिकाणी उसळली आहे.
हेही वाचा- कल्याणमधील गुरुजींचा मुलगा अभिषेक साळेकर सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत राज्यात प्रथम
राम मारूती रोड येथेही भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले, स्वामी प्रतिष्ठानचे प्रमुख आणि भाजपचे पदाधिकारी शिवाजी पाटील तसेच काही आयोजकांकडून कार्यक्रम आयोजित केले आहेत.