संख्या २००नी घटली, संवर्धनासाठी विविध संस्थांचा पुढाकार
वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बावखलांचे योग्य संवर्धन न झाल्याने उरलेली ३०० बावखलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या बावखलांचे संवर्धन होण्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणी वसईतील विविध सामाजिक व पर्यावरण संवर्धन संस्थानी वसई-विरार महानगरपालिकेकडे केली आहे.
वसईच्या पश्चिम पट्टय़ात बावखलांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी याच बावखलांच्या आणि नजीकच्या विहिरींचा वापर होतो. वसईत पूर्वी ५०० च्या आसपास बावखले होती. त्यांची संख्या आता ३०० पर्यंत येऊन पोहोचली आहे. पाण्यातील क्षार संतुलित ठेवण्यासाठी बावखलेंचा उपयोग केला जातो. वसईत जेव्हा बावखलेंची संख्या ५०० च्या आसपास होती तेव्हा पाण्यातील क्षार हे १०० ते १५० च्या आसपास होते.
परंतु आता तेच क्षार ५०० ते ६०० पर्यंत पोहोचले असल्याची खंत बावखल संवर्धनासाठी धडपड करणारी सामाजिक संस्था वसई लाईव्ह ग्रुपच्या ऑल्विन लेमॉस यांनी सांगितले.
वसईत मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्या वाढल्याने जागेच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खाजगी बावखले नष्ट करून त्यावर भराव टाकून ही त्याजागी गृहसंकुले बांधली जात आहेत. या बावखलांच्या संवर्धनासाठी वसई लाईव्ह ग्रुपतर्फे प्रयत्न केले जात आहेत. नाताळ दरम्यान नाताळ गोठा स्पर्धा राबविली जाते. या स्पर्धेचे देखावे हे बावनखलांमध्ये बनवले जावे अशी अट असते. या स्पर्धेमुळे ही बावनखले स्वच्छ होतात. तसेच त्यांच्यातील कचरा टाकण्याची प्रथाही मोडकळीस आली आहे. वसईतील मेरभाट, चित्तरभाट, माळुंगी, पाटलार वाडी या ठिकाणची बावखले ही स्वच्छ झाली असून येथील स्थानिकांना वसई लाईव्ह गृप मार्फत केलेल्या संवर्धनामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत नाही. बाावखले संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा आणि ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना राबवावी अशी मागणी वसई लाईव्ह ग्रुप तर्फे करण्यात आली आहे.
बावखले म्हणजे काय?
बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे हि बावखले वाचवणे, साफ करण्याची, संवर्धन करण्याची ही काळाची गरज आहे. बावखलेच राहिली नाही तर वसईकरांना गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.