शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक कट्टय़ांवर आयोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : करोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मराठी राजभाषा दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा करोना संसर्ग ओसरला असून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रमही ऑफलाइन पद्धतीने राबविले जातात. त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठी राजभाषा दिनानिमित्त ठाणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा सर्वत्र ठिकाणी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मुलांमध्ये मातृभाषेविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष करून हा दिवस साजरा करण्यात येत असतो. सामाजिक तसेच सांस्कृतिक संस्थांकडूनही या दिवशी वेगवेगळय़ा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गेल्या वर्षी करोनासाथीमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिन साजरा करता आला नव्हता. तर, शहरातील संस्था आणि सांस्कृतिक कट्टय़ांवरही ऑनलाइन पद्धतीनेच कार्यक्रम झाले होते. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहेत.  त्यामुळे या वर्षी ठाणे शहरातील नागरिकांना मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

यंदा २७ फेब्रुवारी रविवार आला असल्यामुळे काही शाळा, महाविद्यालयांनी शुक्रवार किंवा शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ठाण्यातील नौपाडा भागात असलेल्या सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांना एक उपक्रम देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी लेखकांची माहिती संकलित करून त्याचे पोस्टर तयार कारायचे आहे. मराठी लेखकांच्या माहितीचे हे पोस्टर प्रदर्शनात मांडण्यात येणार असून ती माहिती सर्व विद्यार्थ्यांना वाचता येणार आहे, अशी माहिती शाळेचे संस्थापक सुरेन्द्र दिघे यांनी दिली.

लोकमान्य नगर भागातील रा.ज.ठाकूर शाळेत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुमाग्रजांच्या कवितांचे गायन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे शाळेचे मुख्यध्यापक डी.आर पाटील यांनी सांगितले. बेडेकर शाळेतही कविता वाचन, अभिवाचन असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना अडसुळे यांनी दिली.

व्याख्यान

ठाण्यातील समतानगर भागात असलेल्या कुसुमाग्रज कट्टय़ातर्फे भाषाभिमानी कुसुमाग्रज या विषयावर साहित्यिका प्रा. पद्मा हुशिंग यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर, ब्रह्मांड भागातील मायबोली मराठी साहित्य रसिक मंडळातर्फे ‘ती’ चे स्वकथन’ हा माधुरी साकुळकर लिखित ‘तिची कथा’ पुस्तकावर आधारित कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या यूटय़ूब पेजवर रविवार, २७ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various programs occasion marathi official language organized at school colleges cultural clubs akp
First published on: 24-02-2022 at 00:05 IST