मुंबईपाठोपाठ वसईत पोलिसांची सायकल गस्त सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी तसेच सोनसाखळी चोऱ्या, छेडछाड आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या सायकल पोलिसांचा अनोखा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यासाठी वसई पोलिसांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता सायकलीवरून पोलिसांच्या गस्त सुरू करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात वसईतीेल सात पोलीस ठाण्यांना ३५ सायकलीे देण्यात आल्या. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी बाजारात, पदपथावर आणि गल्ल्यांमध्ये पोलीस सायकलीने गस्त घालणार आहेत. रस्त्यावर होणाऱ्या भुरटय़ा चोऱ्या, सोनसाखळी चोरी, छेडछाड रोखण्यासाठी या सायकल पोलिसांचा उपयोग होणार आहे. सायकलीवरून गुन्हेगारांचा पाठलाग करणे अपेक्षित नाही तर फिरते पोलीस सतत दिसणे हा त्यामागे उद्देश असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. रस्त्यात पोलीस दिसल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि गुन्हेगारांना वचक बसतो असेही ते म्हणाले. लवकरच लोकांचाही त्यात सहभाग करून घेतला जाणार आहे. पोलीस मित्रांना विशिष्ट गणवेश देऊन आणि ओळखपत्र देऊन त्यांनाही सायकल गस्त करण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे अपुरे पोलीस बळ ही अडचण राहणार नाही. मुंबई शहरातसुद्धा सायकल गस्त सुरू असून सध्या मरिन डाईव्ह आणि चौपाटी येथे ही सायकल गस्त केली जाते.