|| जयेश सामंत

समान जागावाटप करण्यात शिवसेनेला यश; मंदा म्हात्रेंच्या उमेदवारीद्वारे नाईकांनाही शह

नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा आग्रह सोडताना बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण पश्चिमेची जागा पदरात पाडून घ्यायची आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांच्यासाठी आग्रह धरायचा, अशी दुहेरी खेळी करत शिवसेनेने भाजपकडून ठाणे जिल्ह्य़ात नऊ-नऊ जागांच्या वाटपाचा समान फॉम्र्युला पदरात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, काल-परवा पक्षात आलेल्या गणेश नाईकांच्या तुलनेत आपल्या वर्तुळात असलेल्या मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १८ जागांपैकी आठ जागांवर भाजपचे आमदार असून संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे हा आकडा नऊपर्यंत पोहचला आहे. याशिवाय उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबीय भाजपच्या वाटेवर असल्याने या जागेवरही भाजपचा दावा प्रबळ मानला जात होता. जागा वाटपाचे हे गणित पाहिल्यास जिल्ह्य़ातील १८ पैकी १० जागांवर भाजपचा दावा प्रबळ मानला जात होता. शिवाय उर्वरित आठ जागांपैकी कळवा-मुंब््रयाची एक जागा शिवसेनेच्या ताब्यात येणार असल्याने तेथेही पक्षाची अवस्था फार चांगली नव्हती. बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्य़ात भाजपच्या तुलनेत शिवसेनेला जागावाटपात पडती भूमिका घ्यावी लागत असल्याने अगदी सुरुवातीपासून शिवसेना नेत्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा आग्रह धरला होता.

नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही समसमान जागा वाटप व्हावे यासाठी शिवसेना आग्रही होती. या ठिकाणी चार विधानसभा मतदारसंघापैकी तीन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. कल्याण महापालिकेत शिवसेनेचे अधिक संख्याबळ असताना विधानसभेतील जागा वाटपात पडती भूमिका घेणे शिवसेनेला शक्य नव्हते. शिवाय बेलापूरच्या तुलनेत कल्याण पश्चिमेत शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेने बेलापूरचा आग्रह ऐनवेळी सोडत कल्याण पश्चिमेची जागा पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार हे मुख्यमंत्र्यांचे निष्ठावंत मानले जातात.

कोणाला काय मिळाले?

विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील मानल्या जातात. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री अनुकूल होते. याउलट बेलापूरच्या जागेवर गणेश नाईकांना उमेदवारी देण्यास शिवसेनेतील नेत्यांचा विरोध होता.  या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने मंदा म्हात्रे यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली.

हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला गेला असता तर मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव म्हात्रे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याची गणितेही आखली जात होती. त्यादृष्टीने म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी  संपर्क साधल्याची चर्चा होती.

ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार लढणार असल्याने नवी मुंबई आणि पनवेल या दोन्ही शहरांवर वर्चस्व निर्माण करण्याची संधी या पक्षाला मिळणार आहे.

दुसरीकडे, कल्याण पश्चिमची दावेदारी जिंकून शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीतील विधानसभा समतोल राखण्यात यश मिळवले आहे.

युतीचे जागावाटप

  • ठाणे : भाजप
  • ऐरोली : भाजप
  • बेलापूर : भाजप
  • मीरा-भाईदर : भाजप
  • उल्हासनगर : भाजप
  • डोंबिवली : भाजप
  • कल्याण पूर्व : भाजप
  • मुरबाड : भाजप
  • भिवंडी पश्चिम : भाजप
  • कोपरी पाचपाखाडी : शिवसेना
  • ओवळा-माजिवडा : शिवसेना
  • कल्याण पश्चिम : शिवसेना
  • कल्याण ग्रामीण : शिवसेना
  • भिवंडी पूर्व : शिवसेना
  • भिवंडी ग्रामीण : शिवसेना
  • शहापूर : शिवसेना
  • कळवा-मुंब्रा : शिवसेना
  • अंबरनाथ : शिवसेना