मनसे उमेदवारासाठी राष्ट्रवादीचा मेळावा
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेला साथ देण्यासाठी राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी नुकत्याच घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यावर शिक्कामोर्तब केले. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्यापुढे आव्हान निर्माण केले असून या मतदारसंघातील लढत आता चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप-शिवसेना युतीतर्फे संजय केळकर तर मनसेतर्फे अविनाश जाधव हे निवडणूक लढवीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपामध्ये राष्ट्रवादीने हा मतदारसंघ स्वत:च्या पदरात पाडून घेतला. या मतदारसंघातून राष्ट्रवादीने सुहास देसाई यांना उमेदवारी देऊ केली. मात्र अखेरच्या क्षणी पक्षाच्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या राजकीय घडामोडीनंतर ठाणे शहरात मनसेला साथ देण्यासाठी राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असतानाच बुधवारी ठाण्यातील एनकेटी हॉलमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. मनसेचे उमेदवार जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता.
मनसेचे उमेदवार जाधव यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी मेळाव्यात केली, तर जाधव यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले. काँग्रेसकडून हा मतदारसंघ घेताना या ठिकाणी राष्ट्रवादीची संघटना बांधण्याचे धोरण होते. पण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आम्ही आदर करीत असून त्यांच्या आदेशानुसार देसाई यांनी अर्ज मागे घेतला आहे, असेही परांजपे यांनी सांगितले. मी रडणारा माणूस नाही तर लढणारा माणूस असल्याचे सुहास देसाई यांनी मेळाव्यात सांगितले.
म्हणून मतदारसंघातून माघार
भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करण्यासाठी विरोधकांच्या मतांचे विभाजन होऊ नये आणि एकास एक लढत व्हावी यासाठी राष्ट्रवादीने महाराष्ट्रात काही ठिकाणी मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ मनसेला सोडण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळेच सुहास देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, असे नजीब मुल्ला यांनी मेळाव्यात सांगितले. येत्या महापालिका निवडणुकीतही मनसेसोबतची आघाडी कायम राहणार असून ठाणे महापालिकेतील सत्ता ताब्यात घेण्यासाठी तसेच संघटना बांधणी करण्याकरिता विधानसभा निवडणुकीचा उपयोग करा,असेही मुल्ला यांनी सांगितले.