भाजप आणि शिवसेनेच्या युतीमुळे सुरूवातीपासूनच एकतर्फी मानल्या गेलेल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या किसन कथोरे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला आहे. तर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुरबाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमोद हिंदूराव यांचा दारून पराभव झाला आहे. शेवटचे कल हाती येईपर्यंत सर्वच प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार अशी स्थिती मुरबाड मतदारसंघात होती.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातून चौथी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या किसन कथोरे यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक सुरूवातीपासूनच सोपी मानली जात होती. शहरातील आणि ग्रामीण भागातील शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची ताकद पाहता भाजपच्या किसन कथोरे यांनी निवडणुकीपूर्वीच म्हात्रे यांना जवळ केले होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपच्या कथोरे यांचा मोठय़ा प्रमाणावर प्रचार केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमोद हिंदूराव सुरूवातीपासून प्रचारात मागे होते.
मतदानाच्या दिवसापर्यंत शहरात पक्षाचे कार्यकर्ते दिसत नव्हते. स्थानिक नगरसेवक आणि शहरअध्यक्ष आशिष दामले वगळता पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षातर्फे साधे मतदार केंद्राबाहेर बुथही लावले नव्हते. ग्रामीण भागातही प्रचार साहित्य, आर्थिक रसद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यात संतापाचे वातावरण होते.
प्रचाराच्या अखेरच्या दिवसांतही हिंदूराव यांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने प्रचार होऊ शकला नव्हता. सुरूवातीपासूनच एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत या सर्व कारणांमुळे किसन कथोरेंना निवडणुक सोपी जाणार असे बोलले जाते. विशेष म्हणजे किसन कथोरे यांच्या
विक्रमी मताधिक्यामुळे मतदारसंघातील इतर सहा मतदारांची अनामत रक्कम जप्त होणार असल्याचे कळते आहे.