|| सागर नरेकर

सेनेने ओढवून घेतला पराभव : – अंबरनाथ, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण पट्टय़ात एकहाती वर्चस्व राखण्याची आयती संधी शिवसेनेच्या चुकलेल्या रणनीतीमुळे महायुतीला गमवावी लागली आहे. उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्या दरम्यान परंपरागत लढत चुरशीची होत असताना शहापुरात उत्तम स्थितीत असलेल्या शिवसेनेला विजयाची उत्तम संधी होती. मात्र, स्वपक्षातील नेत्यांना दूर सारत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्यावर दाखविलेला अतिविश्वास शिवसेनेच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण ठरले असून या पराभवामुळे शिंदे यांच्याही निर्णयक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात या वेळी भाजप-शिवसेनेला एकहाती विजयाची उत्तम संधी होती. मुरबाड परिसरात किसन कथोरे यांच्या विजयासाठी शिवसेनेचे नेते जिवाचे रान करताना दिसत होते.राष्ट्रवादीने प्रमोद हिंदूुराव यांना रिंगणात उतरविल्याने हा सामना एकतर्फी होणार हे स्पष्टच होते. अंबरनाथमध्येही डॉ. बालाजी किणीकर यांच्यापुढे आव्हान नव्हते. त्यामुळे उल्हासनगर, शहापूर तसेच भिवंडी ग्रामीण या तीन मतदारसंघांतच थोडीफार लढत होईल असे चित्र होते. मात्र, राष्ट्रवादीने शहापुरात शिवसेनेला धक्का देत अधिकची जागा मिळवून अस्तित्व राखले आहे.

मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर राखत ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या पांडुरंग बरोरा यांना पराभवाचा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर पराभूत झालेले दौलत दरोडा यांनीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पराभूत केले आहे. पांडुरंग बरोरा यांच्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी खुद्द शहापुरात येऊन प्रचार केला होता. शहापूर विधानसभा मतदारसंघात यंदाही पारंपरिक अशी दरोडा विरुद्ध बरोरा अशी लढाई होत. राष्ट्रवादीचे आमदार असलेले पांडुरंग बरोरा यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करत शहापूरची उमेदवारी मिळवली होती. युती झाल्याने शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत बरोरा यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. बरोरा यांच्यासाठी पालकमंत्री स्वत: शहापुरात प्रचारासाठी उतरले होते. तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शहापूर मतदारसंघात प्रचारसभा घेत बरोरांना जिंकून देण्याचे आव्हान केले होते. मतदारसंघात प्रचारात आघाडीवर असलेली शिवसेना शेवटच्या काळात मागे पडली होती. जुन्याजाणत्यांना बाजूला सारणे आणि ज्यांच्याविरुद्ध इतके वर्षे प्रचार केला त्यांच्यासाठीच प्रचारात उतरणे अशामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. त्यामुळे बरोरा यांच्या येण्यापासून शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खदखद होती. मतदानापूर्वीच्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारात आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुप्तपणे दौलत दरोडा यांच्या प्रचारासाठी धावाधाव केल्याची चर्चा होती. त्यामुळे बरोरा यांना रोखत दरोडा यांनी १५ हजार १०४ मतांनी बरोरा यांना धूळ चारली आहे. बरोरा यांचा पराभव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जातो आहे.