वेस्टर्न पार्क परिसरावर शोककळा

मुंबईत विलेपार्ले येथे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण मीरा रोड परिसरातील काशिमीरा येथील वेस्टर्न पार्क परिसरातील आहेत. त्यांच्या मृत्यूची खबर पोहोचताच या परिसरात शोककळा पसरली. तरुण वयातच काळाने घाला घातल्याने या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईतल्या मिलन सबवेजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले मुझम्मील माकनोजिया व जुनेद शेख हे वेस्टर्न पार्क परिसरातल्या फातिमा अपार्टमेंट आणि के.डी पॅरेडाईज या इमारतीत राहत होते. मुझम्मील हा काही दिवसांपर्यंत खिडक्यांना स्लाइडिंग बसविण्याचे काम करत होता. सध्या मात्र त्याच्याकडे काहीच काम नव्हते. मुझम्मील आपली आई, मोठा भाऊ व वहिनी यांच्यासोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वीच निधन झाले होते. बुधवारी रात्री मुझम्मील आपल्या मामाची गाडी घेऊन मित्रांसोबत मुंबईला फिरण्यासाठी म्हणून गेला होता. त्याचा भाऊ कामानिमित्त गुजरातला गेला होता. एका अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर मुझम्मील दहा वाजण्याच्या सुमारास गाडी घेऊन निघालेला त्याच्या परिसरातील रहिवाशांनी पाहिले होते, परंतु मुझम्मीलला आपण शेवटचे पाहत आहोत याची त्यांना थोडीदेखील कल्पना नव्हती.

याच परिसरातल्या के. डी. पॅरेडाईज या इमारतीत राहणारा जुनेद शेखही मुझम्मीलसोबत कारमधून गेला होता. जुनेद गाडीवर चालक म्हणून काम करत असे, मात्र तो फारसा कोणामध्ये मिसळत नसल्याने त्याच्याबद्दल इथल्या रहिवाशांना फारशी माहिती नाही. याच परिसरात दुकान असलेला दिलीप सोलंकीदेखील मुझम्मीलसोबत होता. दिलीपचे वेस्टर्न पार्क परिसरात तयार कपडय़ांचे दुकान आहे. अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वीच दिलीपने हे दुकान सुरू केले होते. त्याच्या वडिलांचे काशी गावात रॉयल ऑइल डेपो हे किराणा मालाचे दुकान आहे. दिलीपला धाकटा भाऊ असून तो महाविद्यालयात शिकत आहे.  वेस्टर्न पार्कलगतच असलेल्या राशीद कम्पाऊंड याठिकाणी टायर विक्रीचे काम करणारा अजहरदेखील कारमध्ये त्यांच्या सोबत होता, असे येथील रहिवाशांनी सांगितले. हे चौघे जण एकमेकांचे मित्र होते. अवघ्या २० ते २५ वयातच मृत्यूने गाठल्याने वेस्टर्न पार्क परिसरातले रहिवासी हळहळ व्यक्त करत आहेत.