सुमारे ४०० खाटांची व्यवस्था
ठाणे : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात पाच करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ४०० खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तर, ग्रामपंचायतीत विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना प्रत्येक तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. असे असतानाच, डिसेंबर महिन्याच्या अखेरीसपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूने ठाणे जिल्ह्यात देखील शिरकाव केला. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात पाच करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्फत सुमारे ४०० खाटा उपलब्ध होणार आहेत. या पाच केंद्राच्या माध्यामतून ग्रामीण भागातील बाधितांवर तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार आहे, असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव काही महिन्यांपासून आटोक्यात आला होता. त्यामुळे या भागात जिल्हा प्रशासनाकडून उभारण्यात आलेले करोना काळजी केंद्र बंद करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर महिन्याच्या अखेरीसपासून करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातही दुप्पटीने रुग्णवाढ होत आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात बंद करण्यात आलेले करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
भिनार, मुरबाड, सोनिवली येथे केंद्र
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील भिनार येथे १०० खाटा, मुरबाड येथील ट्राम केअर सेंटरमध्ये ५०, अंबरनाथमधील बीएसयूपी सोनिवली या ठिकाणी ४० खाटांची व्यवस्था असणार आहे. तर, कल्याण आणि शहापूर येथील जागाही निश्चित होणार असून या ठिकाणीही प्रत्येकी १०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार असून उपचारासाठी रुग्णांना इतरत्र जावे लागणार नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ग्रामपंचायतीत विलगीकरण केंद्र
ठाणे ग्रामीण भागात रुग्ण संख्येत आणखी वाढ झाल्यास जिल्ह्यातील मोठय़ा ग्रामपंचायतीत विलगीकरण केंद्र सुरु करण्याच्या सूचना प्रत्येक तालुक्याच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये लक्षणे नसलेली केवळ करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे, अशा रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.