अंबरनाथ : पालिकेच्या निवडणुकांचे वारे जोर पकडू लागले असतानाच त्याच वेगाने इच्छुक उमेदवारांची ‘जनसेवा’ही पुन्हा जोमात सुरू झाली आहे. गेले चार वर्षे जिथे राजकीय गोंधळ आणि न्यायालयीन पेचामुळे निवडणुका रखडल्या. तिथे आता सर्व काही सुरळीत होण्याची वाट दिसत असल्याने इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आता गणपती, गोपाळकाला, मंगळागौर, देवदर्शन, वर्षा सहली आणि लाखोंच्या बक्षिसांच्या ‘कार्यक्रमांचा’ एक नवा उत्सव सुरू झाला आहे. यामागे हेतू कोणताही असो, लोककल्याणाच्या झेंड्याखाली मतांची बेगमी सुरू झाल्याची स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ या नगरपालिकांची मुदत २०२० मध्ये संपली. त्यामुळे पालिका निवडणूक होऊन आता १० वर्षे झाली आहेत. आता प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता असल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील विविध पक्षांचे इच्छुक पुन्हा मैदानात उतरले आहेत. २०१९ साली निवडणुकीच्या आशेने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन झाले होते. मात्र करोना आणि निवडणुका रखडल्याने हा उत्साह ओसरला होता. आता मात्र न्यायालयीन आदेश आणि निवडणुकीच्या स्पष्ट संकेतांमुळे राजकीय हालचालींना नवसंजीवनी मिळाली आहे.
आगामी महिने हे सण-उत्सवांनी भरलेले असल्याने मतदारांशी जवळीक साधण्यासाठीचा हा सुवर्णकाळ असल्याचे इच्छुक उमेदवारांना जाणवले आहे. त्यामुळेच अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत शालेय साहित्य वाटप, महिलांसाठी मंगळागौर आणि आकर्षक भेटवस्तू देणाऱ्या स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षा किंवा वॉटर पार्क सहली, राज्यभरातील विविध स्थळांवर देवदर्शन, गणेशोत्सवात मोफत बस सेवा, रक्तदान शिबिरे, रोजगार मेळावे, क्रीडा स्पर्धा आणि दहीहंडीसाठी साहित्य पुरवठा केला जातो आहे. दहीहंडीवर लाखोंची रोख बक्षिसे जाहीर केली जात आहेत.
समस्याही उदंड जाहल्या
या कार्यक्रम आणि प्रलोभनांचाफायदा मतदारांना होत असला, तरी शहरातील समस्या वेगळ्या आहेत. अंबरनाथ शहरात पथदिवे, पाणी, वीज समस्या गंभीर आहे. बदलापुरातही वीज आणि पाण्याच्या समस्येमुळे भर पावसाळ्यात पाणी कपातीची वेळ आणली आहे. कोंडी तर दोन्ही शहरात नित्याचीच झाली आहे. त्या समस्यांवर आवाज उठवण्याऐवजी वाटपाचे राजकारण का अशी टीकाही काही नागरिक करत आहेत. “निवडणुका आल्या कीच आमचं भलं आठवतं, बाकीच्या चार वर्षांत कुठे होतात लोकसेवक, असा प्रश्नही मतदार उपस्थित करत आहेत.
मंडळांना टीशर्ट, गणेशभक्तांना पूजा कीट
गणेशोत्सवाच्या तोंडावर इच्छुकांची पूजा साहित्य, मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी टीशर्ट छपाईसाठी लगबग सुरू आहे. जाहिरात कशाप्रकारे प्रभावी करता येईल त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांचा आधार घेतला जातो आहे. ही संधी चुकवायची नाही, असा चंग बांधून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.