ठाणे : श्रावणातील भाऊ बहिणीच्या नात्याचे बंधन घट्ट करणारा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त खरेदीसाठी बाजारात वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. याच पारंपारिक सणाला ठाण्यात निसर्ग संवर्धनाची साथ लाभली. या अनोख्या पद्धतीने ठाण्यात रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
भाऊ बहिणीच्या प्रेम आणि विश्वासाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त बाजारात उत्साह असतो. नवनविन पद्धतीच्या राख्या, बहिणीसाठी भेटवस्तू, मिठाई अशा विविध गोष्टींची लगबग असते. यात विविध ट्रेंड देखील येत असतात. दरम्यान ठाण्यातील वनशक्ती संस्था आणि मो ह विद्यालय यांनी एक अनोखी संकल्पना राबवल्याचे दिसून आले. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावाजवळ हा उपक्रम पार पडला. यामध्ये इकोफ्रेंडलीे (ecofriendly) राख्या तयार करण्यात आल्या होत्या. या राख्या तलावाजवळील झाडांना बांधून ‘वृक्ष रक्षण’ आणि ‘संवर्धन’ करण्याचा संकल्प ठाण्यात घेण्यात आला. शाडू माती, धान्य, सुकलेली फुल, पुनर्वापर केलेला कागद, कापड आणि बीजांचा वापर करून विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडलीे (ecofriendly) राख्या तयार केल्या.
ठाण्यातील वनशक्ती संस्था आणि मो ह विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षबंधन हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात विद्यालयाच्या स्काऊट-गाईड पथकातील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी मासुंदा परिसरातील वृक्षांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘वृक्ष रक्षण’ आणि ‘संवर्धन’ करण्याचा संदेश दिला. तसेच यावेळी राखीची पालखी साकारून तिची मिरवणूक काढण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा”, “पर्यावरण संवर्धन करा”, या घोषवाक्यांनी ही मिरवणूक निघाली. यावेळी ताम्हण (राज्यफूल), पिंपळ, हिरवी सावर, कदंब यांसारख्या वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. हे वृक्ष जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
“वृक्षबंधन उपक्रम म्हणजे निसर्गाशी एक आपुलकीच नात जपण्याचा आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा सशक्त प्रयत्न असल्याचे मो ह विद्यालयाचे प्राचार्य विकास पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात शिक्षक सुनील पाटील, स्नेहा शेडगे, मारुती सोनामोरे, श्वेता झाडे, देवेंद्र पाटील, प्रणाली शेंबेकर, संगीता धनकुटे, अरुणा पाटील तसेच वनशक्ती संस्थेचे फिरदोस खान यांचा सहभाग होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरण जागरूकता पोहचवणे, वृक्षांचे महत्त्व पटवून देणे आणि सणांमध्ये शाश्वतता जपणे हा मुख्य उद्देश आहे.- चित्रा म्हस्के, प्रकल्प अधिकारी, वनशक्ती संस्था