ठाणे – शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील १०० आणि पालघरमधील ३५ सार्वजनिक वाचनालय सज्ज झाली असून सर्व ग्रंथसंपदा एकत्रित करणे, वाचनालयाचे सुशोभीकरण करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेणे याची तयारी सर्व जिल्हा ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे. तर ठाणे आणि पालघर येथील १०० वर्षाहून अधिक जुने असलेल्या ६ सार्वजनिक ग्रंथालयांचा यात सर्वाधिक प्रचार – प्रसार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यातील वाचकांना तब्बल २ लाखांहून अधिक पूस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ठाणे जिल्ह्याला मोठी साहित्यसंपदा लाभली आहे. अनेक नामवंत लेखक, साहित्यिक, शास्त्रज्ञ, सिने दिग्दर्शक यांची मोठी मांदियाळी ठाणे तसेच जवळच्या पालघर जिल्ह्यात आहे. यामध्ये सर्वात मोठा येथील सार्वजनिक ग्रंथालयांचा आणि येथील ग्रंथसंपदेचा देखील आहे. याच वाचन संस्कृतीचा प्रचार – प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून नियमित स्वरूपात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमांना सर्वच वयोगटातील वाचकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही लाभतो. याच पार्श्वभूमीवर आता शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नववर्षाच्या मुहूर्तावर १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये ठाणे आणि पालघर येथील १३५ सार्वजनिक वाचनालये सज्ज झाली आहेत.

हेही वाचा – सुकामेव्याच्या थरांनी सजलेली नानकटाई, चॉकलेटची रेलचेल

” शतायू ” वाचनालयांचा सहभाग मोलाचा

ठाणे जिल्ह्यात ठाणे नगर वाचन मंदिर ठाणे, सार्वजनिक वाचनालय, कल्याण, मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे, वाचन मंदिर, भिवंडी तर पालघर जिल्ह्यातील महात्मागांधी सार्वजनिक वाचनालय, वाडा आणि यशवंत राजे सार्वजनिक वाचनालय, जवाहर या वाचनालयांना शंभरहुन अधिक वर्षांचा सुवर्ण इतिहास आहे. अनेक दुर्मिळ आणि वाचनीय ग्रंथसंपदा याठिकाणी उपलब्ध आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून येथील ग्रंथसंपदा वाचकांना उपलब्ध होणार आहे. यामुळे या सुवर्ण इतिहास लाभलेल्या शतायू ग्रंथालयाची माहिती देखील वाचकांपर्यत पोहचणार आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात शासनमान्य १३५ सार्वजनिक वाचनालय आहेत. येथे दोन लाखांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. तर २ लाखांहून अधिक नियमित वाचक नोंदणी आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना परिपत्रक देण्यात आले असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या वाचनालयात त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे परीक्षण करण्याची स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे. यातील उत्तम परीक्षण लेखनाला २६ जानेवारी रोजी पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. तसेच निबंध स्पर्धा, सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा यांसारखे अनेक उपक्रम या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचन संस्कृती वाढावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आणि वाचकांना अनेक दुर्मिळ आणि त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची उपलब्धता करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा ग्रंथालय विभाग आणि सर्व सार्वजनिक वाचनालयांमध्ये तयारी सुरु आहे. सर्व वाचकांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवावा. – प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे