ठाणे : वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम ठाण्यात सुरू आहे. २८ मे ते १ जून या कालावधीत माजिवडा मेट्रो स्थानक निर्माण कामे केली जाणार आहे. या कामासाठी विवियाना माॅल जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी मध्यरात्री बंद करण्यात येणार आहे.
वडाळा- घाटकोपर- कासारवडवली या चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून विवियाना माॅलजवळ माजिवडा स्थानक निर्माणाचे काम सुरू आहे. येथे छत उभारणीसह विविध कामे केली जात आहे. हे काम ६० टन वजनी क्रेनच्या साहाय्याने केले जाणार आहे. ही क्रेन उड्डाणपूलावर उभारली जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून माजिवडा उड्डाण पूलावरून नाशिक किंवा घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना उड्डाणपूलावरून वाहतुक करण्यास बंदी असेल.
घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने उड्डाणपूलाखालून कापूरबावडी चौक मार्गे वाहतुक करतील. तसेच नाशिकच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने उड्डाणपूलाखालून गोल्डन क्राॅस मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल २८ मे ते १ जून या कालावधीत दररोज रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत लागू असतील. या कामांमुळे मध्यरात्री कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.