ठाणे : एकेकाळी ६०हून अधिक तलाव असलेल्या ठाण्याची ओळख तलावांचे शहर अशी होती. मात्र काळाच्या ओघात अनेक तलाव गुडूप झाले तर, तलावांच्या शहराला थेट आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींचा गराडा पडू लागला. प्राचीन काळापासूनच्या इतिहासाच्या खुणा दाखवणाऱ्या ठाण्याच्या ‘तलाव ते टॉवर’ या संक्रमणाचा ‘लोकसत्ता’च्या ‘तलाव ते ठाणे’ या कॉफी टेबल पुस्तकातून वेध घेण्यात आला असून त्याचे येत्या शनिवारी (दि. ३० एप्रिल) ठाण्यात प्रकाशन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत ‘तलाव ते टॉवर’ या कॉफी टेबल पुस्तकाचे सहप्रायोजक ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’, ‘टीजेएसबी सहकारी बँक लि.’, तन्वी हर्बल आणि पुराणिक बिल्डर्स हे आहेत. ब्रह्मविद्या साधक संघ हे पॉवर्ड बाय पार्टनर असून हॉटेल टिपटॉप प्लाझा हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत.
ठाणे परिसराचे जुने नाव श्रीस्थानक. पण त्याआधी हा परिसर साष्टी या नावाने ओळखला जाई. ठाण्याच्या नावांचेच नव्हे तर भौगोलिक, सामाजिक, व्यापारिक वैशिष्टय़ांचे अनेक संदर्भ सहाव्या-सातव्या शतकापासूनच्या शिलालेखांत, देवदेवतांच्या मूर्ती, पुरातत्त्व अवशेषातून सापडतात. ठाण्यातील काही तलावांतून असे अनेक ऐतिहासिक पुरावे समोर आले असून अजूनही तलावांच्या उदरात अनेक अवशेष उघड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सगळय़ांचा रंजक इतिहास आणि माहिती सांगणाऱ्या लेखांचा या कॉफी टेबल पुस्तकात समावेश आहे. तलावांचा परीघ धरून पसरत गेलेल्या ठाण्याच्या राजकीय, सामाजिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, साहित्यिक बदलांचा आढावा घेणारे वैशिष्टय़पूर्ण लेख या कॉफी टेबल पुस्तकात आहेत.
राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने ‘आम्ही ठाणेकर’ या मुक्तसंवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. मुक्तसंवादात गोदरेज इंडस्टिज लिमिटेडचे कार्यकारी संचालक नितीन नाबर, निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव, ईएनटीतज्ज्ञ डॉ. आशेष भुमकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी हे सहभागी होतील. कार्यक्रमास केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असणार आहे.
मुख्य प्रायोजक:
• महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
सहप्रायोजक:
• क्रेडाई – एमसीएचआय ठाणे
• टीजेएसबी सहकारी बँक लि.
• तन्वी हर्बल
• पुराणिक बिल्डर्स
पॉवर्ड बाय:
• ब्रह्मविद्या साधक संघ
हॉस्पिटॅलिटी पार्टनर:
• हॉटेल टीप टॉप प्लाझा