स्टेम प्राधिकरण अखेर नमले; जलसंपदामंत्र्यांच्या आदेशाचे पालन
मीरा-भाईंदर शहराला पाणीकपातीमधून सवलत देण्याचे जलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अखेर स्टेम प्राधिकरण तयार झाली आहे. मीरा-भाईंदर शहराला पाणीकपात लागू करण्याचे नवे आदेश येत नाहीत, तोपर्यंत शहराला स्टेम प्राधिकरणाकडून पाणीकपात करण्यात येणार नाही, अशी माहिती स्टेम प्राधिकरणाच्याच अधिकाऱ्यांनी दिली. जलसंपदामंत्र्यांच्या आदेशांना स्टेम प्राधिकरण विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’ने प्रसिद्ध केले होते. स्टेमच्या या निर्णयामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरण व एमएमआयडीसी या दोन्ही स्रोतांकडून ४० टक्के पाणीकपात सुरू आहे. मात्र मीरा-भाईंदरची पाण्याची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन शहराला पाणीकपातीमधून वगळण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डिसेंबर महिन्यात दिले होते. या वेळी एमआयडीसीकडची पाणीकपात सुरूच ठेवण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला होता. त्यानुसार जानेवारी महिन्यात स्टेमने मीरा-भाईंदरची पाणीकपात मागे घेतली. परंतु लघु पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठय़ाचे नवे धोरण लागू केल्यानंतर पाणीकपात पुन्हा सुरू झाली. लघु पाटबंधारे विभागाचे हे धोरण फसल्याने ते आपोआपच गुंडाळले गेले. मात्र धोरण गुंडाळले गेल्यानंतर जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानुसार स्टेम प्राधिकरणाकडून मीरा-भाईंदरची पाणीकपात रद्द करणे आवश्यक होते. मात्र मंत्र्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवत स्टेमने पाणीकपात पुन्हा लागू केली. याबाबत ‘लोकसत्ता वसई-विरार’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताचे पडसाद उमटले. बुधवारी स्टेम प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक कर्नल विवेकानंद चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी मीरा-भाईंदर महापालिकेत दाखल झाले. या वेळी स्टेम अधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर तसेच विरोधी पक्षांचे नगरसेवक यांची संयुक्त बैठक झाली. स्टेमच्या पाणीकपातीमुळे शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईबाबत स्टेमच्या अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जलसंपदामंत्र्यांच्या आदेशांचे पालन करा, असा आग्रह धरण्यात आल्यानंतर स्टेम प्राधिकरण अधिकाऱ्यांनी जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानुसार पाणीकपात मागे घेण्याचे बैठकीत मान्य केले. याव्यतिरिक्त एमआयडीसीकडून नवी मुंबईला देण्यात येणाऱ्या पाण्यापैकी दहा दशलक्ष लिटर पाणी मीरा-भाईंदरकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती कर्नल चौधरी यांनी दिली.
त्यामुळे या गुरुवारी व शुक्रवारी स्टेम प्राधिकरणाकडून शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. मात्र एमआयडीसीची पाणीकपात सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut withdrawn in mira bhayandar
First published on: 25-02-2016 at 05:35 IST