ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) शुक्रवारी बारवी गुरुत्व जलवाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा चोवीस तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा शहरातील काही भाग, डोंबिवली, तळोजा, कल्याण डोंबिवली पालिका, उल्हासनगर पालिका क्षेत्र, २७ गाव, ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा शुक्रवारी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे, पुढील दोन दिवस या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू राहण्याची शक्यता आहे, असे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ठाणे जिल्ह्यातील काही भागांत जांभूळ  जलशुद्धीकरण केंद्रातून गुरुत्व जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम एमआयडीसीकडून हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून पुढील २४ तास जिल्ह्यातील काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोलशेत, वागळे इस्टेट, कळवा येथील काही भाग, दिवा शहर, मुंब्रा येथील अग्निशमन दल केंद्र ते अल्साम कॉलनी भाग तसेच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, तळोजा, ग्रामपंचायती, २७ गाव हद्दीतील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.