scorecardresearch

डोंबिवलीत बेकायदा इमारतींचा पाणीपुरवठा खंडित; पाण्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

डोंबिवलीत पालिकेची परवानगी न घेता पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरुन चोरुन नळजोडणी घेतलेल्या इमरतींचा पाणी पुरवठा पालिकेने खंडीत केला आहे.

डोंबिवलीत बेकायदा इमारतींचा पाणीपुरवठा खंडित; पाण्याची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
डोंबिवली पश्चिमेत गरीबाचा वाडा भागातील चोरीच्या नळ जोडण्या

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सर्वाधिक बेकायदा पाणी चोरीच्या जोडण्या डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत असल्याच्या तक्रारी पुढे येताच पालिकेने या जोडण्या शोधण्याची मोहीम घेतली आहे. त्यात डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौकात दोन बेकायदा इमारतीच्या भूमाफियांनी पालिकेची परवानगी न घेता पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरुन चोरुन पाच नळ जोडण्या घेतल्याची बाब समोर आली असून या नळ जोडण्या पालिकेने तोडून त्या इमारतींचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच याप्रकरणी पालिका अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अज्ञात इसमांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- ठाणे : बोगस सनद प्रकरणाची चौकशी करा; खुद्द आमदारांकडूनच मागणी, प्रकरणाचे गांभीर्य वाढले

डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत गरीबाचापाडा येथे श्रीधर म्हात्रे चौकात द्रौपदी बाई दत्तु स्मृती, ओम शिव साई या दोन बेकायदा इमारती भूमाफियांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीत बांधल्या आहेत. या इमारती मधील रहिवाशांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा म्हणून भूमाफियांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मान्यतेशिवाय एक इंची व्यासाच्या पाच नळ जोडण्या घेतल्या होत्या. शहरातील प्रत्येक इमारतीला पाणी पुरवठा विभागाकडून एक नळ जोडणी मंजूर केली जाते. पाणी टंचाईचा विषय असेल तर दुसरी जोडणी मंजूर केली जाते.

द्रौपदी बाई दत्तु स्मृती, ओम शिव साई सदन इमारतीच्या मालकांनी पाच चोरीच्या नळ जोडण्या इमारतींना घेतल्या होत्या. याविषयी पालिकेत काही रहिवाशांनी तक्रार करताच, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुध्द सराफ यांनी द्रौपदी बाई स्मृती, ओम शिव साई सदन इमारतीला होणाऱ्या पाणी पुरवठ्याची पाहणी केली. मुख्य जलवाहिनीवरुन चोरीच्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असल्याचे सराफ यांच्या निदर्शनास आले. या जोडण्यांच्या परवानग्यांची कागदपत्र रहिवाशांकडे नव्हती. या जोडण्या कोणी घेतल्या आहेत याचीही माहिती रहिवाशांनी दिली नाही.

ठाणे- डोंबिवलीत महाराष्ट्रनगर मधील बनावट मोजणी;नकाशाच्या आधारावर बांधलेल्या इमारतीची परवानगी रद्द

ऑगस्ट मध्ये या चोरीच्या जोडण्या घेतल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. द्रौपदी बाई स्मृती, ओम शिव साई इमारतीच्या चोरीच्या नळ जोडण्या तोडण्यात आल्या. मागील पाच महिन्याच्या काळात या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांनी तीन हजार घन मीटर पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे प्रती घन मीटर १७ रुपये ५० पैशांप्रमाणे ४१ हजार ८६० रुपयांचा दंड या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांना आकारण्यात आला. या नळ जोडण्या घेणाऱ्या अज्ञात इसमांविरुध्द अभियंता सराफ यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. बेकायदा नळ जोडण्या करणारे प्लम्बर टिटवाळा, कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिमेत भागातील असून याच भागात सर्वाधिक पाणी चोरी होत असल्याचे पालिका कर्मचारी सांगतात. शनिवारी, रविवारी पालिकेला सुट्टी असते. या दोन दिवसात कल्याण, डोंबिवलीत सर्वाधिक चोरीच्या नळ जोडण्या घेतल्या जातात.

हेही वाचा- कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्याला बेदम मारहाण

डोंबिवली पश्चिमेत चोरीच्या नळ जोडण्या शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या सोसायट्या, चाळींनी चोरीच्या नळ जोडण्या घेतल्या आहेत. तेथील मालक, नळ जोडणी करणारे प्लम्बरवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नळ जोडण्यात तोडण्यात येत आहेत. याशिवाय पाणी वापराचे दंडात्मक देयक वसूल केले जाणार आहे,अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुदध सराफ यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 16:03 IST

संबंधित बातम्या