कल्याण – कल्याण पूर्व शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी (ता. ५) सकाळी १० ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या कालावधीत पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेमधील देखभाल दुरुस्ती, बारावे जलशुध्दीकरण केंद्रातील देखभालीचे काम केली जाणार आहेत, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

कल्याण पूर्व शहराला बारावे जलशुध्दीकरण केंद्र येथून पाणी पुरवठा केला जातो. या जलशुध्दीकरण केंद्रात मंगळवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वेळेत देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. उल्हास नदीमधून कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी उचलले जाते. हे पाणी मोहिली, बारावे, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये शुध्दीकरण करून मग कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहराच्या विविध भागात सोडले जाते.

पावसाळा सुरू असल्यामुळे उल्हास नदीमधून अधिक प्रमाणात गाळ, पालापाचोळा वाहून येतो. हे पाणी उदंचन केंद्र येथे उचलल्यानंतर जलशुध्दीकरणासाठी जलशुध्दीकरण केंद्रात पाठविले जाते. नदीतून हे कच्चे पाणी उचलल्यानंतर त्यात अधिक प्रमाणात गाळ, पालापाचोळा आणि इतर कचरा असतो. हे पाणी प्रक्रिया करून जलशुध्दीकरण केंद्रात आल्यानंतर कच्च्या पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करताना शुध्दीकरण प्रक्रियेतील तांत्रिक भाग मातीचा रवळ भाग, गाळ यामुळे जाम होतात. त्यामुळे जलशुध्दीकरण प्रक्रियेवर ताण येतो. तांत्रिक बिघाड होतात. ही प्रक्रिया वेळीच दुरूस्त केली नाहीतर मोठा बिघाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे बारावे येथील जलशुुध्दीकरण केंद्राच्या दुरूस्तीचे काम यावेळी हाती घेण्यात येणार आहे.

तसेच, कल्याण पूर्व भागात अनेक ठिकाणी पालिकेच्या मुख्य जलवाहिन्या, गृहसंकुलांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. या पाणी गळती विषयी नागरिकांना तक्रारी आहेत. ही गळतीची ठिकाणे जलवाहिन्यांमध्ये पाणी वाहत असल्याने तात्काळ बंद करता येत नाही. त्यामुळे त्या परिसरात पाणी पुरवठा बंद करून मगच पाणी पुरवठा विभागाच्या तांत्रिक पथकाला गळतीची ठिकाणे बंद करतात येतात. ही कामे या बंदच्या कालावधीत पाणी पुरवठा विभागाकडून कल्याण पूर्वेतील भागात केली जाणार आहेत.

कोळसेवाडी, काटेमानिवली, विजयनगर, चिंचपाडा, खडेगोळवली, तिसगाव, चक्कीनाका, मलंगगड रस्ता, लोकग्राम परिसरातील पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.