कडोंमपाचे ६ कोटीचे नुकसान; करदात्यांवर देयकाचा बोजा; सत्ताधारी नगरसेवकाच्या आरोपामुळे खळबळ
कल्याण डोंबिवली शहरांमध्ये सुमारे ३० हजार चोरीच्या नळजोडण्या आहेत. या चोरीच्या नळजोडण्यांचा पाणीपुरवठा बंद केला, प्रत्येक सोसायटीत असलेली बुस्टर काढून टाकली तरी, शहरांना मुबलक पाणीपुरवठा होईल. अलीकडे पाणीकपातीचे जे संकट कल्याण डोंबिवली शहरांवर घोंघावत आहे, ते कमी करण्यासाठी चोरीच्या नळजोडण्या तोडणे हा एकमेव उपाय आहे. परंतु, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि प्लम्बर यांच्या संगनमताने या चोरीच्या नळजोडण्या घेण्यात आल्या असल्याने, अशा जोडण्यांवर प्रशासन कारवाई करताना हात आखडता घेत आहे, असा आरोप सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासमोर या चोरीच्या नळजोडण्यांचा लेखाजोखा नगरसेवक म्हात्रे यांनी मांडला आहे. कल्याण डोंबिवली शहरांमध्ये ६० टक्के पाणीकपात आहे. या पाणीकपातीमधील २० टक्के पाण्याची गळती होते. उर्वरित २० ते ३० टक्के पाणी बेकायदा चाळी, इमारतींना चोरून नळजोडण्या घेऊन वापरले जाते. चोरून पाणी पिणारे ग्राहक पालिकेला एक पैशाचे देयक भरणा करीत नाहीत. हा सगळा पाणी देयकाचा बोजा प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांवर येऊन पडत आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
शहरातील अनेक चाळींच्या ठिकाणी बेकायदा इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये २० ते २५ रहिवासी राहतात. या इमारतींना अधिकृत दोन व चोरून वाढीव नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पालिकेकडून इमारत दराने पाणी देयक येणे आवश्यक आहे. पण, चाळींच्या जागी उभ्या करण्यात आलेल्या सर्व बेकायदा इमारतींना चाळीच्या दराने पाणी देयक पाठविण्यात येते. या सगळ्या व्यवहारात पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
एजन्सी चालकांची माघार
चोरीच्या नळजोडण्या तोडण्यासाठी पालिकेने अनेक वेळा एजन्सी नेमण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक भूमाफियांची दादागिरी आणि काही राजकीय मंडळींकडून भूमाफियांची पाठराखण होत असल्यामुळे एजन्सी चालक ही फुकटची दादागिरी का सहन करायची, असा प्रश्न करीत पालिकेचे काम घेण्यास पुढे येत नाहीत, असे म्हात्रे यांनी सांगितले.
आयुक्त ई. रवींद्रन यांनी या सगळ्या चोरीच्या नळजोडण्यांची गंभीर दखल घ्यावी आणि पाणीचोरी मुक्त होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार
पाणीपुरवठा विभागातील प्रभाग कार्यालयातील कर्मचारी, प्लम्बर, सोसायटी, चाळमालक, दलाल यांच्या संगनमताने हा मोठा भ्रष्टाचार अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा भ्रष्टाचार थांबवावा म्हणून आपण गेल्या पाच वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. परंतु, पालिका अधिकारी आणि तेथील भ्रष्टाचाराची पाठराखण करणारी यंत्रणा आपल्याला जोगाजागी नामोहरम करीत आहे, अशी खंत शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षात असूनही सत्ताधारी नगरसेवकाची ही खंत पालिकेत किती अंदाधुंद कारभार सुरू आहे, याची प्रचीती देते.