ठाणे : ठाणे येथील केव्हीला परिसरात अवकाळी पावसामुळे नाल्यात पाणी तुंबून ते आसपासच्या सोसायटीत शिरून रहिवाशांचे हाल झाल्याचे चित्र बुधवारी दिवसभरात दिसून आले. के व्हीला या रस्त्याखालून जाणारा नाला रुंद करण्यात आला असला तरी याच नाल्यावर स्लॅब टाकून के-व्हीला ते पंचगंगादरम्यान रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नाल्यात बांबू लावण्यात आल्यामुळे नाल्यातील कचरा अडकून तुंबलेले पाणी आसपासच्या सोसायटीत शिरल्याचे समोर येत आहे. या बंदिस्त नाल्यामुळेही भविष्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ठाणे शहरात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे अवघ्या काही मिनिटात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके तयार झाले होते. उथळसर येथील भगीरथ जगन्नाथ, सामंत वाडी, इंदिरा कॉलनी या परिसरात बाजूच्या नाल्याचे पाणी शिरले. सांडपाणी असल्यामुळे इमारतीच्या परिसरातून नागरिकांना येजा करणे शक्य होत नव्हते. रहिवाशांनी महापालिकेस तक्रार केल्यानंतर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले.
कर्मचाऱ्यांनी येथील गृहसंकुलातील साचलेले पाणी आणि कचरा बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. या भागामध्ये यापुर्वीही पाणी साचत होते. यामुळे येथील रस्त्या खालून जाणाऱ्या नाल्याची रुंदी वाढविण्याचे काम पालिकेने काही वर्षांपुर्वी पुर्ण केले होते. या नाल्यात शहराच्या डोंगर भागातून कचरा वाहून येतो. हा कचरा नाल्याच्या पुलाजवळ अडकून पडला होता. यामुळे नाल्यातील पाण्याची पातळी वाढली. या नाल्यात आसपासच्या इमारतींचे सांडपाणी सोडण्यात आलेले आहे. पाण्याची पातळी वाढल्याने सांडपाणी जाणे बंद होऊन सोसायटीत पाणी तुंबले, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
कचरा का अडकला
ठाणे कारागृहाच्या भिंतीलगत हा नाला असून या नाल्यावर स्लॅब टाकून के-व्हीला पूल ते पंचगंगादरम्यान रस्ता तयार करण्यात येत आहे. यासाठी नाल्यावर ६७६ मीटर लांब इतका स्लॅब टाकण्यात येत आहे. यामुळे के-व्हीला राबोडी मार्गे कळवा-साकेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. परंतु या स्लॅबच्या कामासाठी नाल्यात बांबू रोवण्यात आले आहेत.
या बांबूमुळे कचऱ्यास अडथळा निर्माण झाला आणि तो नाल्याच्या पुलाजवळ साचला. यामुळे नाल्यातील तुंबलेले पाणी सोसायटीत शिरल्याची माहिती रहिवाशांनी दिली. या नाल्यावर स्लॅब टाकून रस्ता करण्यात येत आहे. परंतु या नाल्यात डोंगर भागातून कचरा वाहून येतो. हा कचरा स्लॅब खाली असलेल्या भागात अडकला तर, नाल्याचे पाणी तुंबून ते परिसरात शिरू शकते, अशी भितीही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात बऱ्याच घरात नाल्याचे पाणी जाऊन नुकसान होते. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड आणि के विल्हा येथील रस्त्याखालील नाल्याचे रुंदीकरण केले. पावसाचे पाणी सुरळीत जाईल, या उद्देशातून हे काम करण्यात आले. परंतु गेली ४ ते ५ के विल्हा नाल्यावर बांधकाम सुरू आहे. यामुळे बुधवारी कचरा येऊन पाणी अडकले. त्यामुळे परिसरातील भगीरथ जगन्नाथ, सामंत वाडी , इंदिरा कॉलनी येथील घरात पाणी शिरले. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे या ठिकाणी पाहणी करून नाल्याच्या बांधकाम बाबत योग्य तो निर्णय घ्या, अशी मागणी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
नाल्यावर स्लॅब टाकून के-व्हीला ते पंचगंगादरम्यान रस्ता तयार करण्यात येत असून हे काम २० मे पर्यंत उरकण्याचे येणार होते. परंतु अवकाळी पाऊस आल्याने कचरा अडकून पाणी तुंबले होते. येथील नाल्यातील अडथळे काढून टाकण्यात आले आहेत. प्रशांत सोनग्रा नगर अभियंता, ठाणे महापालिका