scorecardresearch

उन्हाळ्यात पाणीदिलासा; बारवी धरणात पाच वर्षांच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाणीसाठा

जवळपास सात महिने पडलेल्या पावसामुळे यंदाच्या वर्षांत जलस्रोतांमध्ये जानेवारीपर्यंत मुबलक पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.

बदलापूर : जवळपास सात महिने पडलेल्या पावसामुळे यंदाच्या वर्षांत जलस्रोतांमध्ये जानेवारीपर्यंत मुबलक पाणीसाठा तयार झाला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात सद्य:स्थितीत ४८.११ टक्के इतके पाणी आहे, तर आंध्रा धरणात ३७.७० टक्के पाणी अजूनही शिल्लक आहे. या दोन्ही धरणांची पाणी साठवण क्षमता बरीच मोठी आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षांत मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे पावसाला लवकर सुरुवात झाली होती. त्यानंतरचा जून महिना नेहमीप्रमाणे कोरडा गेला. जूलै महिन्यात ठाणे जिल्ह्यातील नद्यांना पूर आले होते. हा पाऊस ऑक्टोबपर्यंत पडला. मात्र अवकाळी पावसाने जानेवारी महिन्यापर्यंत हजेरी लावली. परिणामी जिल्ह्यातील जलसाठय़ांमध्ये जानेवारी महिन्यापर्यंत पाण्याचा साठा होत राहिला.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना, ग्रामीण भागाला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या बारवी धरणात सध्याच्या घडीला ४८.९१ टक्के पाणी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. बारवी धरणात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. बारवी धरणात यंदा १६५.७१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणाची एकूण क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
गेल्या वर्षांत पाण्याची ही टक्केवारी ४३.०५ टक्के इतकी होती, तर गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडाअखेरीस यंदा समाधानकारक पाणीसाठा असल्याचे समोर आले आहे. पाण्याचा हा साठा समाधानकारक असल्याने कोणत्याही प्रकारची पाणीकपात यंदाच्या वर्षांत होणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. उल्हास नदीत आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. त्या आंध्रा धरणात सध्या १२७.८५ दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या ३७.७० टक्के पाणीसाठा धरणात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गेल्या वर्षांत हाच पाणीसाठा ३१ टक्के इतका होता. त्यामुळे आंध्रा धरणातही समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे.
भातसा धरणही निम्मे भरलेलेच
भातसा धरणात यंदाच्या वर्षांत ४६८.५० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची एकूण क्षमता ९४२.१० दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे धरण अजूनही ४९.७३ टक्के भरले आहे. गेल्या वर्षांत हाच पाणीसाठा ४४८.१८ दशलक्ष घनमीटर इतका म्हणजे ४७.५७ टक्के इतका होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watering summer satisfactory water storage barvi dam year compared five years amy

ताज्या बातम्या