डोंबिवलीकरांच्या तिखट प्रतिक्रिया

डोंबिवली : सांस्कृतिक शहर अशी ओळख मोठय़ा तोऱ्यात मिरवणाऱ्या कल्याण, डोंबिवली या शहरांची प्रतिमा पायाभूत सुविधांची वानवा, भ्रष्टाचार, अस्वच्छता, प्रदूषण या समस्यांनी मलिन केली होतीच; पण त्यातूनही प्रशासकीय व्यवस्था म्हणून येथील नागरिकांना पालिकेबद्दल वाटणारा विश्वास करोनातील परिस्थिती हाताळणीमुळे साफ उडाला आहे. या शहरातील आरोग्य व्यवस्थेचे कधीच तीनतेरा वाजले होते, करोनामुळे या व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली अशा तीव्र प्रतिक्रिया आता कल्याण डोंबिवलीकरांमधून उमटू लागल्या आहेत.

कल्याण डोंबिवली शहरात करोनामुळे उघडय़ा पडलेल्या आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र लोकसत्तामधून मांडण्यात आले. नियोजनशून्य कारभार आणि यंत्रणा उभी करण्यात आलेले अपयश यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून येथील रहिवाशी भीतीच्या छायेत वावरत आहेत. शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर आसूड ओढताना याबद्दल नाराजी व्यक्त केली. यातील काही निवडक प्रतिक्रिया..

नागरिक म्हणतात..

एप्रिल-मे मध्ये करोनाची कल्याण, डोंबिवलीत रुग्ण संख्या वाढू लागली, त्यावेळी प्रशासनाने योग्य नियोजन करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या असत्या तर करोनाचा कहर दिसला नसता. ज्यावेळी करोना रुग्णांना रुग्णालय, उपचाराची गरज होती, त्यावेळी लोकांचे हाल झाले. आता उशिरा लाखो रुपये खर्चून करोना रुग्णालये सुरू केली जात आहेत, यासाठी रुग्ण उपलब्ध होतील का याविषयी शंका आहे. करोनाच्या निमित्ताने पालिकेची आरोग्य वैद्यकीय व्यवस्था किती ढिसाळ आहे, कुचकामी आहे हे प्रकर्षांने दिसले. 

– माधव जोशी, अध्यक्ष, श्रीलक्ष्मी नारायण सामाजिक संस्था, डोंबिवली.

करोनाच्या महामारीतही या शहरांमध्ये जागोजागी कचरा, खड्डे, विजेचा लपंडाव असे चित्र आहे. नागरिक, प्रभागाची नस माहिती असलेल्या नगरसेवकांना प्रशासनाने विश्वासात घेतले नाही. आपत्ती कायद्याचा आधार घेऊन साधा कामगार दुकानदाराला दुकान बंद करण्यास लावतो. कोणीही गाडी अडवून वाट्टेल तसे प्रश्न विचारतो. करोना राहिला बाजूला, पण या बेलगामपणाने लोक अधिक हैराण आहेत.

-विवेक पंडित, संस्थापक, विद्यानिकेतन शिक्षण संस्था.

कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी पक्षांनी विरोधक, अधिकाऱ्यांना हाताशी धरून मागील २५ वर्षांत हजारो कोटी रुपयांचा चुराडा केला. तीच ती गटारे, पायवाटा, खड्डय़ांसाठी खर्च केला गेला. करोनामुळे महापालिका प्रशासन पूर्ण उघडे पडले. एवढय़ा वर्षांत सुसज्ज सर्वोपचारी रुग्णालय पालिका बांधू शकले नाही. ब्राह्मण सभेजवळील सूतिकागृह कोणत्या लोकप्रतिनिधीच्या ठेकेदाराने बांधायचे, त्यामधील वाटय़ावरून १० वर्षे रखडले आहे. टिटवाळ्यातील ३० एकर रुग्णालयाची जागा माफियांनी हडप केली आहे.

-प्रशांत परुळेकर, उद्योजक

लोक, व्यापारी करोनाचे सर्व नियम पाळतात. दुकानांचा सम-विषम प्रकार आता बंद करून नागरिक आणि व्यापाऱ्यांना सुखाने आपले व्यवहार करू द्यावेत. करोनाचा आकडा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे कमी होत नसेल तर त्याची शिक्षा लोकांना कशासाठी?

कविता महाजन, गृहिणी

डोंबिवली परिसरात राहणाऱ्या सहकारी बँकेतील नोकरदारांना रेल्वेतून प्रवास मुभा नाही. त्यांना बस, खासगी वाहनाने मुंबई परिसरातील कार्यालयाने तीन ते चार तासाचा प्रवास करून गाठावी लागतात. राष्ट्रीयकृत, सहकारी असा भेद शासनाने न करता अशा कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा द्यावी. पालिकेची धरसोड धोरणे त्यामुळे करोनापेक्षा लोक पालिकेने काढलेल्या आदेशांना सर्वाधिक घाबरले असे चित्र होते.   

-उदय पेंडसे, बँक अधिकारी