अंबरनाथः कल्याण–बदलापूर राज्यमार्ग तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशोत्सव निमित्त उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी आता वाहनधारकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहेत. महात्मा गांधी शाळेसमोरील सिग्नल, शास्त्री विद्यालयाजवळ अशा ठिकाणी तर या कमानींमुळे परिस्थिती गंभीर बनली असून या कमानींमुळे रस्त्याच्या एका बाजूला थेट अडथळा निर्माण होतो आहे. या ठिकाणांहून ये जा करणाऱ्या वाहनांना सिग्नलवर थांबून पुढे जाण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे. त्यामुळे उत्सवाचा उत्साह पूरे आता अशी प्रतिक्रिया वाहनचालक उपस्थित करत आहेत.
ठाणे जिल्हा गेल्या काही महिन्यात मोठ्या कोंडीचा सामना करत आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास खर्ची घालावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना अनेकदा धारेवरही धरले आहे. त्यावरून मोठे राजकारणही रंगले आहे. अशात नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढे येण्याऐवजी भर रस्त्यात कमानी लावत नागरिकांचीच कोंडी केली जात असल्याचे चित्र आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गणेशोत्सवाच्या काळात विविध ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांसह गणेशभक्तांचीही कोंडी झाली. गणेशोत्सवानंतर या कमानी हटवल्या जातील अशी अपेक्षा होती. मात्र नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर लोकप्रतिनिधींनी याच कमानींवरील गणेशोत्सवाचा मजकूर असलेला फलक काढून त्यावर लवकरच येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या मजकुराचा फलक लावण्याची तयारी सुरू केली आहे.
अंबरनाथ, बदलापूर शहरातील कल्याण बदलापूर राज्यमार्गासारख्या महत्वाच्या रस्त्यासह फॉरेस्ट नाका ते होप इंडिया, अंतर्गत रस्ते अशा सर्वांवर या कमानी नव्या फलकांची वाट पाहात आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर रस्ता अडवून उभारलेल्या या कमानींमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. एखादी रुग्णवाहिका आली तर तिला मार्ग काढण्यासाठी इतर वाहनांना बाजूला घेऊन वेळ वाया जातो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्याचा फटका शेजारी असणारे रिक्षाचालक, लहान वाहने यांना बसतो आहे. अनेकदा या कमानींमुळे सिग्नलचे गणितही बिघडते आहे. परिणामी ऐन चौकात वाहनचालकांत खटके उडताना दिसत आहेत.
शुभेच्छा नको, दिलासा द्या
मुख्य रस्ता, दुभाजकांवर लावले जाणारे फलक, कमानी यांमुळे नागरिकांना शुभेच्छांचा कमी मात्र त्रास दिला जात असल्याचा अनुभव येतो आहे. यामुळे वाहनचालक मंडळ, लोकप्रतिनिधींना लाखोल्या वाहतात. तुम्हाला शुभेच्छाच द्यायच्या असतील तर फलक आणि कमानी काढून कोंडीमुक्त प्रवासाच्या शुभेच्छा द्या अशी भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत. गणेशोत्सवात केलेली चूक नवरात्रोत्सवात टाळा अशीही विनंती नागरिक करत आहेत.