कल्याण – कल्याण शिळफाटा, दिवा शीळ रस्ता मुसळधार पावसामुळे रात्रीतून जलमय झाले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक वाहने या रस्त्यावर अडकून पडली आहेत. काहींनी वळसा घेऊन पर्यायी मार्गाने प्रवास सुरू केला आहे. या सर्व विषयांवर आपण सातत्याने शासनाचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे शिवसेनेचे स्थानिक खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे लक्ष्य वेधत आहोत. पण कोणालाही लोकांच्या या महत्वपूर्ण गंभीर विषयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी खंत व्यक्त करत कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी ‘शु.. चूप…विकास कामांच्या विषयावर काहीही बोलायचे नाही,’ अशी टिप्पणी ट्वीवटरच्या (एक्स) माध्यमातून केली आहे.

कल्याण शीळफाटा रस्ता कल्याण लोकसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतो. या दोन्ही मतदारसंघात खासदार म्हणून डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार म्हणून शिंदे शिवसेनेचे राजेश मोरे नेतृत्व करत आहेत. कल्याण शीळफाटा रस्त्यावरील दररोजची वाहतूक कोंडी. नवीन काटई निळजे रेल्वे पुलाचा केलेला चुथाडा, पलावा चौकातील उड्डाण पुलाची वाढती गरज, काटई निळजे रेल्वे मार्गावरील निळजे दिशेने सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे संथगतीने काम, शिळफाटा रस्त्याचे काटई ते देसाई परिसरात रखडलेले रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण, बाधित शेतकऱ्यांना द्यावयाची सुमारे ३०७ कोटीची रखडलेली भरपाई, शिळफाटा रस्त्यालगतच्या दुतर्फा नसलेली गटारे. हे सर्व प्रश्न मार्गी लागले तर शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, मुसळधार पावसात रस्ता जलमय होणे हे सर्व प्रकार थांंबणार आहेत. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर आपण अनेक वेळा पत्रव्यवहार केले आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, अशी पाटील यांची खंत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून हे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी खासदार डाॅ. शिंदे, आमदार राजेश मोरे यांची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी प्रचार सभांमधून या भागातील बहुतांशी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शिंदे शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीर सभा, स्थानिक बैठकांमधून लोकांंना दिले आहे. त्याची अंमलबजावणी निवडणुका संपल्यानंतर केली नाही. त्याचा त्रास आता लोकांना होत आहे, असे मनसेचे राजू पाटील यांनी सांगितले.

आपण मांडत असलेले प्रश्न हे आपले व्यक्तिगत नाहीत. गावकीचे नाहीत तर सार्वजनिक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविले तर शिळफाटा रस्त्यावरील कोंडी, जलमय रस्ता असे सर्वच प्रश्न सुटणार आहेत. स्वताला विकासपुरूष म्हणून घेणारेच या महत्वाच्या विषयावर काहीही बोलत नसल्याने रस्ता कोंडी, जलमय परिस्थिती वाढत चालली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये स्वता काही करायचे नाही आणि दुसरा पाठपुरावा करतो त्याच्या तक्रारीची दखल घ्यायची नाही. अशी परिस्थिती असेल तर ठीक आहे. तुम्ही गप्प मग, ‘शु…चुप्प…आम्ही विकासकामांवर काही बोलणार नाही’. लोकांना अडकून दे शिळफाटा रस्त्यावरील दररोजच्या वाहतूक कोंडीत आणि मुसळधार पावसामुळे जलमय घाणीच्या पाण्यात, अशी उपरोधिक टिपणी राजू पाटील यांनी केली आहे.