ठाणे – ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेतून निवृत्त होताना, अशोक शिनगारे यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त होताना काही काळ मी विमनस्क अवस्थेत होतो.’ एकांतात विचार करताना मनात प्रश्न आला, आपण खरंच न्याय दिला का? आणि त्याच क्षणी उत्तर मिळाले ‘प्रयत्न केले, पण ते पुरेसे नव्हते,’ असे भावूक शब्द शिनगारे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

राज्यातील सत्ताबदलानंतर विविध जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी पदी असलेल्या राजेश नार्वेकर यांच्या जागी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची वर्णी लागली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून शिनगारे यांची ठाणे जिल्हाधिकारी पदी म्हणून वर्णी लागल्याचे बोलले जात होते. तर, राजेश नार्वेकर हे ठाकरे गटाचे संजय राऊत यांचे व्याही असल्याने यांची बदली झाली असल्याच्या ही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. यामुळे ठाणे जिल्हाधिकारी पद चांगलेच चर्चेत आले होते.

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३१ जुलै रोजी सेवानिवृत होत आहेत. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात अनौपचारिक संवाद साधला. ठाण्यातील पत्रकारिता ही संवेदशील असून येथील सर्व पत्रकार जबाबदार आहेत. त्यांनी नेहमी प्रशासनाला समांतर भूमिका घेऊन आणि सदसद्विवेकबुद्धीने खूप चांगले सहकार्य केल्या बदल जिल्हाधिकारी शिनगारे यांनी पत्रकारांचे आभार मानले. तसेच गेले पावणे तीन वर्षात वेळेअभावी मला पत्रकारांशी संवाद साधता येऊ शकला नाही, याबाबत खंत देखील व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादरम्यान, अनेकांनी आपला वैयक्तिक अनुभव मांडले. यावेळी प्रत्येक अनुभवातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यातील एक समाजसेवक, लोकसेवक दिसत होता. पत्रकार असो किंवा आणखी कोणीही काही काम दिले तर, ते त्यांच्यासाठी वैयक्तिक नव्हते ते सामाजिक होते. याचे भान ठेऊन शिनगारे यांनी ते काम मार्गी लावले होते. ठाणे जिल्हाधिकारी आवारातील काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तो रस्ता बनवणे खूप गरजेचे आहे अशी समस्या एका पत्रकारांनी या अनौपचारिक संवादा प्रसंगी मांडली. या तक्रारीला गांभीर्याने घेत शिनगारे यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले आणि दोन ते तीन दिवसांच्या आत काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या तत्परतेचे आणि कार्यकुशलतेचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.