दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला हिंदू, मुस्लीम अशी लेबलं लावण्याची गरज नाही. एकदा कळलं की तो दहशतवादी आहे की त्याचा ठेचलंच पाहिजे अशी रोखठोक आणि आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. दहशतवादाला हिंदू, मुस्लीम अशी लेबलं जोडायची आणि माथी भडकवत रहायची हे सुरू आहे जे गैर आहे. दहशतवाद्याला ठेचलंच पाहिजे. त्याला धर्म नसतो असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
“दहशतवादी हा दहशतवादी असतो, त्याला कोणताही धर्म नसतो आणि त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे.” – मनसे अध्यक्ष @RajThackeray pic.twitter.com/H4dYV29aP2
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) May 16, 2019
अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले गेले, बोस्टनमध्ये एक स्फोट घडवण्यात आला. या स्फोटाला जे जबाबदार होते त्यांना दीड दिवसात अटक झाली. ट्विन टॉवर पाडण्याचा कट रचणाऱ्यालाही ठार करण्यात आलं. याला म्हणतात कृती किंवा दहशतवादाविरोधात उचलेलं ठोस पाऊल. या दोन घटना सोडल्या तर अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला नाही. दहशतवादाला उत्तर अशा प्रकारे द्यायचं असतं असं उदाहरणही राज ठाकरेंनी दिलं. दहशतवाद ठेचलाच पाहिजे यात काहीही शंका नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचं राजकारण कसं काय करू शकता असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला जी स्वप्नं दाखवली जी आश्वासनं दिली. त्यातलं एकही पाळलं नाही. नरेंद्र मोदी त्याबद्दल आता बोलतही नाहीत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचंही समर्थन पंतप्रधान कशा काय करू शकतात असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. दरम्यान १७ मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विकण्यासाठी मोर्चा निघणार आहे. या मोर्चासंदर्भात राज ठाकरेंनी एक आवाहनही केलं आहे. १७ मेच्या दिवशी दुपारी १ वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. गावदेवी मैदान ते महानगरपालिका असा मोर्चा काढला जाईल. शेतकऱ्यांना एकट्याने असो किंवा सामूहिकपणे असो त्यांनी उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सहकार्य केलंच पाहिजे अशी राज ठाकरेंची भूमिका आहे.