लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी भागात राहत असलेल्या एका सुस्थितीत कुटुंबातील महिलेला एका इसमाने उसन्या पैशावरुन डोक्यात हातोडा मारुन व टोकदार वस्तू मानेला टोचून गंभीर जखमी केले. मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार तक्रारदार महिलेच्या घरात घडला.
राजीव भुयान असे आरोपीचे नाव आहे. ममताराणी सुभाष पात्रा (साईश एनक्लेव्ह, अंबिकानगर, शितलादेवी मंदिराजवळ, डोंबिवली) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.
आणखी वाचा-डोंबिवलीत खचलेल्या रस्त्यामधून प्रवाशांचा प्रवास
पोलिसांनी सांगितले, मंगळवारी सकाळी तक्रारदार महिला ममताराणी या घरातील कामे उरकत होत्या. पती कामावर गेले होते. त्यावेळी आरोपी राजीव भुयान घरी आला. त्याने ममताराणी यांना तुमच्या पतीने माझ्याकडून उसने पैसे घेतले आहेत. ते मला तात्काळ परत करा, अशी मागणी केली. महिलेने पती घरी नाहीत. ते घरी आले की पैसे देऊ असे राजीव यांना सांगितले.
पैसे मिळत नाहीत लक्षात आल्यावर आरोपी राजीव याने ममताराणी यांना हाताने मारहाण सुरू केली. ममताराणी यांनी त्यास प्रतिकार केला. त्याने दाद दिली नाही. संतप्त राजीवने स्वताच्या पिशवीतील हातोडा काढून तो ममताराणी यांच्या डोक्यात जोराने मारला. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर आरोपीने इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू घेऊन ती ममताराणी यांच्या मानेला टोचली. गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. महिलेने टिळकनगर पोलीस ठाण्यात राजीव भुयान विरुध्द तक्रार केली आहे.