डोंबिवली – डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील सोनल बिझनेस पार्कमधील एका महिलेकडून चालविल्या जात असलेल्या केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या, या केश कर्तनालयाच्या गाळ्याची बनावट कागदपत्रे तयार करून महिलेची फसवणूक करून तिला गाळा रिकामा करण्यासाठी धमकावणाऱ्या गाळे मालका विरुध्द केश कर्तनालय चालक महिलेच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता नरेश चिरंनगट्टील (४५, रा. रिजन्सी इस्टेट, दावडी, डोंबिवली, मूळ रा. मनीसिटी, जि. त्रिचूर, केरळ) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. वर्गिस डॅनिअल , थंगच्ची डॅनिअल, शालू डॅनिअल अशी गुन्हा दाखल गाळे मालकांची नावे आहेत.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार सुनिता चिरंनगट्टील या डोंबिवलीत राहण्यास होत्या. त्या घरडा सर्कल येथील सोनल बिझनेस पार्कमध्ये वर्गिस डॅनिअल आणि कुटुंबीयांच्या नावे असलेल्या दोन व्यापारी गाळ्यांमध्ये केशकर्तनालय, चेहरा सौंदर्यीकरण सजावट केंद्र चालवित होत्या. सात वर्षाच्या भाड्याने नोंदणीकृत करार करून ५ लाख ४० हजार मालकाकडे ठेव रक्कम आणि दहमहा ९० हजार भाड्याने हे गाळे सुनिता यांनी वापरास घेतले होते. सात वर्षाचा हा भाडेपट्टा होता. या गाळ्याचे सुनिता गाळे मालक वर्गिस यांना नियमित भाडे देत होत्या.
हेही वाचा >>> ठाणे :आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सप्टेंबर २०१९ मध्ये रात्रीच्या वेळेत वर्गिस डॅनिअल यांनी सुनिता यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता गाळ्याला स्वताचे कुलुप लावून गाळा सुनिता यांना वापरास बंदी केली. दुसऱ्या दिवशी सुनिता यांना हा प्रकार कळला. त्यावेळी त्यांना गाळ्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचे पत्र वर्गिस यांनी महावितरणला दिल्याचे समजले. सुनिता व त्यांचे पती नरेश यांनी वर्गिस यांची भेट घेतली. त्यांनी काहीही न ऐकता गाळा रिकामा करण्यास धमकावले. आपला करार सात वर्षाचा आहे. अद्याप साडे पाच वर्ष बाकी आहेत, असे सुनिता यांनी सांगूनही वर्गिस यांनी त्यांचे काही ऐकले नाही. उलट करारपत्र रद्द करण्यास धमकावले.
वर्गिस यांनी सुनिता यांची साहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. सुनिता यांनी गाळ्यामधील वस्तू पाहण्याची मागणी केली. गाळा उघडल्यानंतर त्यामधील ६० लाखाचे फर्निचर गायब होते. तेथील कपाटातील ८६ हजाराचा किमती ऐवज गायब होता. याविषयी वर्गिस यांनी उडवाउडवीची उत्तरे सुनिता यांना दिली. उलट वर्गिस यांनी सुनिता यांच्या नावाची गाळा रिकामा करण्याची बनावट नोटीस तयार केली होती. या नोटिशीनंतर सुनिता यांनी गाळा रिकामा करण्यासाठी मुदत वाढून देण्यासाठी केलेले सुनिता यांच्या स्वाक्षरीचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले होते. ही बनावट कागदपत्रे पाहून सुनिता यांना धक्का बसला. वर्गिस डॅनिअल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आपली फसवणूक केली, बनावट दस्तऐवज तयार केले म्हणून सुनिता यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.