कल्याण : कल्याणमधील एका व्यावसायिक विद्यावाचस्पती (पीएच.डी.) असलेल्या महिलेची मध्य रेल्वेमध्ये तंत्रज्ञ असलेल्या एका कर्मचाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने आम्ही तुम्हाला पेट्रोल पंंप मिळवून देतो, असे सांगून या व्यावसायिक महिलेकडून टप्प्याने २१ लाख रूपये उकळले. त्यानंतर या महिलेला पेट्रोल पंप नाहीच, पण, त्यांचे घेतलेले २१ लाख रूपये परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याने या महिलेने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली आहे.

मागील पाच वर्षाच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या महिला व्यावसायिकाचा उत्तरप्रदेश येथे एलपीजी वितरणाची एजन्सी आहे. या व्यावसायिक महिलेचे पती मध्य रेल्वेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. कल्याण पूर्वेत तिसगाव भागात हे कुटुंब राहते. व्यावसायिक महिलेचा रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी असलेला पती यांची नवी मुंबईतील सानपाडा रेल्वेच्या कार्यशाळेत काम करणाऱ्या एका तंत्रज्ञानाशी ओळख होती. दोन्ही कुटुंबीयांचा रेल्वेतील नोकऱ्यांमुळे परिचय झाला होता. रेल्वेतील तंत्रज्ञ आणि त्यांची पत्नी फेब्रुवारी २०१९ मध्ये व्यावसायिक महिलेच्या कल्याणमधील घरी आले होते. त्यांंनी आमची पेट्रोलियम मंत्र्यांकडे ओळख आहे. आम्ही तुम्हाला पेट्रोल पंपचा परवाना, वंगण विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे आश्वासन दिले.

आपण कल्याण ऐवजी ठाणे, नवी मुंबईत राहण्यास या, असे सांगितले. आपले नवी मुंबई, नेरूळ, ठाणे, दिवा, कल्याण येथे सदनिका असल्याचे त्यांनी सांगितले. नेरूळ येथील जागा भाड्याने घेण्यासाठी महिला व्यावसायिकाने तयारी दाखवली. ती जागा अन्य एका व्यक्तिची असल्याचे महिला व्यावसायिकाच्या निदर्शनास आले. रेल्वे तंत्रज्ञाने जुलै २०१९ मध्ये महिला व्यावसायिक आणि त्यांच्या पतीला आम्ही तुम्हाला पेट्रोल पंप मिळवून देतो असे सांगून यासाठी ५० लाख रूपये लागतील असे सांगितले. महिला व्यावसायिकाने वीस लाख रूपये भरण्याची तयारी दाखविली. उर्वरित रक्कम पेट्रोल पंप ताबा मिळाल्यावर भरा असे रेल्वे तंत्रज्ञाने सांगितले. महिला व्यावसायिकाने रोख आणि ऑनलाईन माध्यमातून एकूण २१ लाख दोन हजार रूपये रेल्वे तंत्रज्ञ आणि त्यांच्या पत्नीच्या ताब्यात दिले. या २१ लाख रूपयात आम्ही तुमचे काम केले नाहीतर आम्ही तुम्हाला आमचा ठाणे रायलादेवी, वारलीपाडा भागातील सदनिकेची मूळ कागदपत्र आपल्याकडे तारण ठेवतो, असे सांगून ती कागदपत्रे महिला व्यावसायिकाच्या ताब्यात दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्हाला पेट्रोल पंपची वितरणाची एजन्सी नको आम्हाला पैसे परत करा, असा तगदा महिला व्यावसायिक आणि तिच्या पतीने रेल्वे तंत्रज्ञाच्या मागे लावला. त्यांनी आपले काम सुरू आहे. थोडे थांबा अशी उत्तरे देण्यास सुरूवात केली. महिला व्यावसायिक आणि त्यांचा पती रेल्वे तंत्रज्ञ, त्याच्या पत्नीला संपर्क करू लागले. ते टाळाटाळ करू लागले. रेल्वे तंत्रज्ञाविरुध्द डोंगरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे महिला व्यावसायिकाला समजले. तंत्रज्ञाने आपलीही सदनिकेची बनावट कागदपत्रे आपणास देऊन, तसेच पेट्रोल पंपासाठी घेतलेले पैसे घेऊन आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर व्यावसायिकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. टी. मोहिते तपास करत आहेत.