लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर: विषबाधा झाल्याने आईसह आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती गंभीर आहे. भाईंदर पश्चिमेच्या मुर्धे गावात चव्हाण कुटुंबीय राहतात.
शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास राम चव्हाण हे गावावरून आले असता त्यांना आपल्या घरातील दार बंद दिसले. त्यामुळे त्यांनी खिडकीतुन आत पहिल्यानंतर त्यांना आपला मुलगा रोहीत (८) हा जमिनीवर पडला असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.यावेळी पत्नी कविता चव्हाण (२७) हिच्या तोंडाला फेस येऊन ती पडलेली होती. आणि भाऊ शाम चव्हाण (२७) हा देखील बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे त्यांनी तिघांना उपचारासाठी भाईंदर पश्चिम येथील भीमसेन जोशी रुग्णालयात आणले. परंतु, मुलाचा आधीच मृत्यू झाला होता. तर आईवर उपचार सुरु असताना तिचा पहाटे मृत्यू झाला आहे. शाम चव्हाण यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे.
आणखी वाचा-ठाणे: घोडबंदर मार्गावर भीषण अपघात, कंटेनर चालकाचा मृत्यू
प्राथमिक अंदाजानुसार जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी सांगितले आहे.