ग्रामीण भागातील महिला बचत गटही निराधार

पापड, मसाले, वाळवणाचे पदार्थ बनवण्याची कामे ठप्प झाल्याने रोजगार संकटात

पापड, मसाले, वाळवणाचे पदार्थ बनवण्याची कामे ठप्प झाल्याने रोजगार संकटात

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : उद्योग, व्यवसायात येऊन स्वावलंबी व्हावे यासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी गेल्या काही वर्षांत यशस्वी प्रयत्न झाले आहेत. मात्र करोना संकटाच्या काळात या बचत गटांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देणारे हात रिकामे झाले आहेत. मसाले, पापड, लोणचे, वाळवणाचे पदार्थ यांच्या माध्यमातून गृहउद्योग करत आपल्या कुटुंब चालवणाऱ्या ग्रामीण भागातील महिला रोजगाराअभावी हतबल आहेत.  त्यामुळे हे उद्योग बंद पडल्याने अशा कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत महिला बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या बचत गटांच्या माध्यमातून पापड, कुरडया, वाळवणाचे पदार्थ, लोणचे, मसाले यांसारख्या पदार्थाची निर्मिती करण्यात येते. या पदार्थाना शहरी भागांत चांगली मागणी असते. तसेच या गृहोद्योगांसाठी बचत गटांना राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध सुविधा व स्वस्त कर्जपुरवठाही केला जातो. मात्र, सध्या टाळेबंदीमुळे हे उद्योग पूर्णपणे बंद झाले आहेत.

बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये कामगारांना नाश्ता पोहोचवणाऱ्या अस्मिता बचत गटाच्या महिलांना याचा मोठा फटका बसला आहे. ‘आम्ही काही कंपन्यांत दररोज नाश्ता देत होतो. त्यामुळे आम्हाला सात ते आठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. मात्र टाळेबंदीत कंपन्या बंद पडल्याने आम्ही अडचणीत आलो आहोत,’असे मेधा शिंगोटे यांनी सांगितले. शिंगोटे यांचे पती याच परिसरात चहाचे दुकान चालवायचे. मात्र, त्यांचा व्यवसायही बंद झाला आहे. त्यामुळे आता कुणाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या आधारावर या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे.  घे भरारी बतच गटाच्या माध्यमातून पापड लाटण्याचा व्यवसाय करणाऱ्या दीपाली घरत यांच्याही उत्पन्नाला करोनाचा फटका बसला आहे. आम्ही कुटुंबातील चौघे जण पापड लाटून उदरनिर्वाह करायचो. मात्र आता सर्व बंद पडले आहे. बँकेतील बचत काढून सध्या गुजराण सुरू आहे. मात्र ते पैसे संपल्यावर पुढे काय असा प्रश्न आहे,’ असे त्या सांगतात. गेल्या काही वर्षांपासून पापड, कुरडया आणि इतर वाळवणाचे पदार्थ बनवून त्याची विक्री करणारे संतोष खेडेकरही टाळेबंदीमुळे जायबंदी झाल्याचे सांगतात. लोक इतके घाबरले आहेत की दिलेली ऑर्डरही घेऊन जात नाहीत, पुढे जर टाळेबंदी उठली नाही तर आम्हाला कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा अशा प्रश्न भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले.

साहित्य अनुपलब्ध, चक्कीही ओस

मसाला निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मिरची, धने, मिरे, लवंग, दगडफूल, दालचिनी यांसारखे साहित्य, पापड बनवण्यासाठीचे पापडखार, डिंक यांसारख्या वस्तूही बाजारत कमी मिळतात. त्यात संसर्गाच्या भीतीने ग्राहकही कमी झाल्याचे ग्रामीण भागातील मसाला चक्कीचालक सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Women self help groups in rural areas face job crisis zws

ताज्या बातम्या