जोडकार्ड किंवा जोडपत्रं.. सद्य:स्थितीत आपली ओळख पूर्णपणे हरवून बसलेला हा शब्द.. साधारण २०/२५ वर्षांपूर्वी घरातील ‘कन्या’ उपवर झाली की जोडकार्डाचा सिलसिला सुरू व्हायचा. तसा ठाण्याच्या चंद्रवदनमधील रामदास खरे यांच्या घरी जोडकार्डाचा रतीब असायचा. वधूसंशोधनासाठी नाही हं, त्यांना tv21असलेल्या आगळ्यावेगळ्या छंदासाठी. मराठीतील शब्दप्रभूंचे हस्ताक्षर पत्रांच्या रूपात जमवणे याचे खरे यांना वेड.
खरे एक संवेदनशील कवी. महाविद्यालयात असल्यापासून ते कवितेच्या विश्वात विहार करू लागले. चंद्र चांदण्यांच्या आभासी जगात न रमता वर्तमानपत्रातील ‘खरे’पण शब्दांत गुंफू लागले. ‘कविताशी’, ‘लोकप्रभा’, ‘लोकसत्ता’, ‘कवितारती’, ‘ठाणे वैभव’, यातून रसिकांच्या विशेषत: काव्यप्रेमींच्या मनात उतरू लागले. साध्या, स्वच्छ, परखड स्पंदनाची एक भावविश्व साकारलं ते म्हणजे ‘स्पंदन’. ठाण्याचे कवी म. पां. भावे आणि नरेंद्र बल्लाळ यांच्या हस्ते ते प्रकाशात आले. १९९४ चे हे ‘स्पंदन’ कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपर्यंत रामदास खरे यांनी पोहोचवले आणि त्यांच्यातर्फे मिळालेल्या शुभेच्छापत्राने रामदास खरे यांच्या पत्रसंग्रहाचा श्रीगणेशा झाला.
‘स्पंदन’ या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींची स्पंदनं खरे यांना जाणवली, अर्थात जोडपत्रांच्या माध्यमातून. वाचनाची आवड होतीच, त्यातून भावलेलं न भावलेलंही ते लेखकांपर्यंत पोहोचवू लागले. लेखकाच्या हस्ताक्षरातील उत्तर म्हणजे जणू लेखकाचा सहवास, लेखकाची भेट, त्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब, ते पाहताना रामदास खरे मनोमन सुखावले. वाचन व्यासंगाच्या जोडीने काव्याचा प्रपंचही बहरू लागला.
या ‘पत्रोपत्री’ फुलणाऱ्या नात्यामुळे कवी निरंजन उजगरे यांचे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन लाभले. ‘काय लिहायचं, काय लिहायचं नाही’ याबाबत त्यांचा नेमका सल्ला मिळाला. ‘आपलीच कविता मोठय़ाने वाचून स्वत:च ऐका, त्याने ‘कान तयार होतो’ असा कवी मंगेश पाडगांवकर यांनी यशाचा कानमंत्र दिला. ‘अमुक शब्द गाळावेत, अमुक शब्द खटकतो’ असं परखड, समीक्षणात्मक पत्र कवी शंकर वैद्य यांनी खास ‘शाईचे पेन’ वापरून पाठवले. ‘इंच इंच लढवू’ अशा थाटात पोस्टकार्डाचा कोपरान् कोपरा ‘इंच इंच भरवू’ असा भरभरून पाठवला होता. ‘वाचनापाठोपाठ चिंतन आवश्यक आहे. कोरडं वाचन केलं तर तो डोळ्याला त्रास आणि मेंदूला उपास असा प्रकार होईल,’ असं सांगत विनोदी लेखक वि. आ. बुवा यांनी खरे यांना अलगद चिंतनाच्या पायरीवर आणून ठेवले. ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी ‘स्वामी आपण लढावे ऐसे लढावे, ऐसे लढावे, माझ्या कुंकवाच्या कमानीला हिऱ्या माणकांचे तेज चढावे,’ अशा स्फूर्तिदायक ओळींतून प्रोत्साहन दिले. ठाण्याचे जनकवी पी. सावळाराम यांनी ‘गंगायमुना डोळ्यांत उभ्या का?’ या काव्यपंक्ती लिहून पाठविल्यामुळे त्यांचेही डोळे पाणावले. नागपूरच्या राम शेवाळकर यांनी ‘काळ्या रेषा, वाढता वाढल्या लांब लांब, आभाळातील परमार्थाच्या आधाराला झाल्या खांब’ असा ‘सूचक’ आधार दिला.
कवयित्री शांता शेळके यांनी ‘सामाजिक वास्तवाचे चांगले प्रतिबिंब’ असा मोकळा अभिप्राय देत दुसऱ्या पत्रात ‘अंगणातील बकुळ फुलांचे नाते भूतकाळाशी जोडण्याची कल्पना’ रुचल्याचे कळवले. ‘छापील अक्षरांविषयी लोकांमधील अनास्था वाढत चालली असण्याच्या काळात आपण लेखकांची हस्ताक्षरं गोळा करण्याचा खटाटोप करत आहात,’ असा कौतुकाचा भाव मंगला गोडबोले यांनी व्यक्त केला. वसंत आबाजी डहाके यांनी प्रत्येक शब्दावर रेघ मारण्याऐवजी सरळ रेघ मारून.. लिहून सगळ्यांच्या मनातल्या ठसठसणाऱ्या वेदनेला स्पर्श करता येतो’ हे लेखनाचे मर्म सांगितले आहे. ‘लेखकांच्या पत्रांच्या सांस्कृतिक ठेव्यामध्ये या पत्राने काय भर पडेल ते ‘खरे’ तर रामदासच जाणे’, अशी नम्र भूमिका ज्येष्ठ समीक्षक व. दि. कुलकर्णी यांनी घेतली आहे. ‘आनंदित झालो, संकोचलोदेखील आहे, तरीपण अशी दादच लेखकाला लिहिते ठेवते,’ अशी दिलखुलास प्रतिक्रिया शं. ना. नवरे यांनी पाठवली आहे. ‘नशीब म्हणजे रेशनकार्ड आहे का, सर्वाना सारखे मोजून मिळायला, कपाळाचा पोत तरी कुठे सारखा आहे, तोच मजकूर लिहायला’, असा जगण्याचा वेगळा पोत ज्योत्स्ना देवधरांनी उलगडून दाखवला. ‘मन भाव उल्हसित वृत्ती निर्भर असू द्या, प्रश्न सुंदराचा आहे, उत्तर सुंदर असू द्या’ अशी ‘संजीवनी’ देणाऱ्या संजीवनी मराठे यांच्याशिवाय कोण असणार? स्नेहलता दसनूरकर यांनी आपल्या साहित्यातला मजकूर न देता त्यांचं आवडतं पसायदान लिहून पाठवले. व. पु. काळे यांनी ‘तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजकारणी लोकांनी बोध घ्यायचं ठरवलं तर त्यांनी फक्त मनाचे श्लोक वाचले तरी भारतात किमया घडेल’ असा कालातीत ‘समर्थ’ विचार व्यक्त केला. पत्राबरोबरच त्यांनी पाठविलेले पाकीटही त्यांनी जपून ठेवले आहे. ‘परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?’ अशा शब्दात वंदना विटणकर यांनी ‘भेटीची’ इच्छा दर्शविली. खरे यांचे ग्रेस हे दैवत. निदान सही तरी मिळू दे म्हणून खरे यांनी रजिस्टर एडीने पत्र पाठविले. सही मिळाली आणि त्यांनी केलेल्या कौतुकाला ‘ग्रेसफुल’ अक्षरात व्यक्त झाले. याचे गणित मांडता आरती प्रभूंचे पत्र मिळणे शक्यच नव्हते. परंतु त्यांच्या मित्राकडे, मनोहर शुक्ल यांच्याकडे प्रभूंचे पत्र होते. त्याने झेरॉक्स दिली. दुर्गाबाई भागवत यांनी सुचवलेली पाकक्रिया पत्नी शुभांगी हिने करून बघताच खरे यांनी ‘उत्तम’ अशी प्रतिक्रिया कळविली. ‘मीही जेवणावळीत सामील झाले आहे’, असा चपखल अभिप्राय दुर्गाआजीने लगेच पाठवला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भाषाप्रभूंची ‘ही अक्षरलेणी’ रसिकांना भेटीचा आनंद देतील, हेच खरे!