श्रावण महिन्यात अनेकांना मांसाहार व्यज्र्य असतो. काही जण गणपती तर काही पुढे नवरात्रीपर्यंत मटण-मासे खात नाहीत. मात्र चमचमीत खाण्याची जिभेची सवय खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी अनेक जण र्तीदार मिसळ खाऊन दुधाची तहान ताकावर भागवितात. लालभडक गरमागरम रस्सा, त्यात आवडीनुसार फरसाण आणि त्यावर कांदा-कोथिंबीर पेरलेले मिसळीचे वाडगे समोर आले की खवय्यांची जणू ब्रह्मानंदी टाळीच लागते. त्यावर लिंबाची फोड पिळून पावासोबत हे स्वर्गीय चवीचे मिसळनामक मिश्रण म्हणजे शाकाहारातला मोठा बेतच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे परिसरात चमचमीत मिसळ मिळण्याचे अनेक लोकप्रिय कॉर्नर आहेत. डोंबिवलीतील ‘येडय़ाची मिसळ’ त्यापैकी एक. सात सुरांच्या व्याकरणात बांधलेले संगीत इथून-तिथून सारखे असले तरी घराण्यांनुसार जसा सादरीकरणात फरक पडतो, असेच मिसळीचेही असते. ‘र्ती’ हा मिसळीची स्थायीभाव. बाकी इतर जिनसांमध्ये प्रदेशानुसार फरक पडतो. कोल्हापुरी, पुणेरी अशी मिसळीची घराणी प्रसिद्ध आहेत. आता काहींनी फ्यूजन करून वेगळी चव साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘येडय़ाची मिसळ’ मात्र अस्सल पुणेरी. पारंपरिक पद्धतीच्या घरगुती मसाल्यांचा वापर करून ही मिसळ बनवली जाते. लवंग, दालचिनी, दगडफुल, बडीशेप, मिरे आदी मसाल्यांचे पदार्थ दररोज सकाळी येथे दळले जातात. दीड ते दोन किलो सुके खोबरे इथे दररोज भाजले जाते. त्यानंतर मिसळीसाठी लागणारा तळका मसाला येथे बनविला जातो. दररोज जवळपास दहा किलो वाटाणे इथल्या मिसळीसाठी लागतात. र्तीचा रंग बघूनच तोंडाला पाणी सुटते. पोटात कावळे ओरडायला लागतात. या मसाल्याचा गंध या परिसरात दरवळत असल्याने खवय्यांचा इथे गराडा पडतो. मिसळीची चविष्ट र्ती त्यावर टाकलेले शेव -फरसाण ,बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि पाव.. पाहूनच मन तृप्त होते. विशेष म्हणजे मिसळीची किंमतही तुलनेने कमी आहे. त्यामुळे पोट भरण्याचा हा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहे.

‘घरगुती दर्जेदार मसाल्यांचा वापर करून बनविलेली ही मिसळ तू इतक्या कमी किमतीला कशी देतोस, वेडाबिडा झाला नाहीस ना, असा आपुलकीचा प्रश्न माझ्या मित्रमंडळींनी विचारायला सुरुवात केली. त्यांनी प्रेमाने काढलेल्या त्या खरडपट्टीकडे मी दुर्लक्ष केले. उलट मिसळीचे बारसेच येडय़ाची मिसळ असे केले,’ मालक रवींद्र जोशी आणि हेमंत भालेकर यांनी कॉर्नरच्या काहीशा विचित्र नावामागची कहाणी सांगितली. दररोज इथे सरासरी शंभरेक प्लेट मिसळ संपत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

याशिवाय इथे दररोज सकाळी तीन किलो पोहे, तीन किलो उपमा आणि तीन किलो शिरा केला जातो. शिरा करताना त्यामध्ये केशर आणि केळ्याचा हमखास वापर करतात. तीन किलो शिऱ्यात किमान दोन किलो केळी टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यानिमित्त कधी अळूची वडी, कधी कोंथिबीर वडी तर कधी चक्क तांदूळ, मुगडाळ, रताळ्याची खीर असे पदार्थही इथे मिळतात. तांदळाची खीर करताना ते तांदूळ स्वच्छ धुतले जातात. त्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटले जातात. त्यात साखर, ओले खोबरे आणि दुधाचा समावेश केला जातो. येथील तांदळाच्या खिरीची चव लाजवाबच. त्यामुळे आणखी एक वाटी घेण्याचा मोह खवय्यांना आवरत नाही. मात्र श्रावणी सोमवारी किंवा उपवासाच्या दिवशीच या खिरीची चव चाखता येते. गरमागरम वाफाळलेले पोहे खाण्यासाठी येथे सकाळी खवय्ये गर्दी करतात. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ हे कॉर्नर असल्याने सकाळी पोहे, उपमा किंवा शिरा खाऊनच नोकरदार गाडी पकडतात. तीन वर्षांपूर्वी हे कॉर्नर सुरू झाले. ते आता शहरभर प्रसिद्ध आहे. ‘येडय़ाची मिसळ’ कुठे मिळते, असा प्रश्न विचारत विचारत खवय्ये येथे येतात, अशी माहिती ऋचा जोशी यांनी दिली. मिसळपाव अवघ्या तीस रुपयांना तर पोहे, उपमा आणि शिऱ्याची डिश प्रत्येकी वीस रुपयांना मिळते. रविवारची संध्याकाळ सोडून आठवडाभर हे कॉर्नर सुरू असते.

येडय़ाची मिसळ

  • कुठे?- १, गारवा सोसायटी, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, एव्हरेस्ट हॉलसमोर, डोंबिवली (प.)
  • कधी ?- सकाळी ८ ते रात्री १० आणि रविवार सकाळी ८ ते दुपारी २
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yedyanchi misal dombivali special misal in dombivli