ठाणे : सध्या राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे जंगलातील वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत चालल्यामुळे वन्य प्राणी तहान भागवण्यासाठी मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन येऊरच्या जंगलात असलेला ‘चिंबीचे पाणी’ या नैसर्गिक पाणवठ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. हा उपक्रम स्वराज्य सामाजिक संस्था, ठाणे आणि जीवोहम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला.
येऊर जंगलातील हा नैसर्गिक पाणवठा अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गाळ, माती, पालापाचोळा, दगड यामुळे तो झाकला गेला होता आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह खंडित झाला होता. परिणामी, या भागातील बिबट्या, सांबर, हरीण, वानर, ससे, भेकर यांसारख्या वन्यप्राण्यांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीकडे वळावे लागत होते. जे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. ही गंभीर गरज लक्षात घेऊन स्वराज्य सामाजिक संस्था आणि जीवोहम ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘चिंबीचे पाणी’ या पाणवठ्याची संपूर्ण स्वच्छता करून तो वन्यजीवांसाठी खुला करण्यात आला.
या कामात माती, गाळ, दगड, पाचोळा हटवून पाणवठा मोकळा करण्यात आला. यावेळी जीवोहम ट्रस्टचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी सांगितले की, पावसाळ्याआधी जंगलातील सर्व बुझलेले पाणवठे खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून बिबट्या, ससे, भेकर, वानर, सांबर यांसारख्या वन्यजीवांची तहान भागवता येईल. तसेच या कार्यात स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष संजय देवकर, परेश परब, विजय सावंत, प्रशांत सातपुते तसेच ट्रस्टचे सदस्य समीर डिके, वीरेंद्र सावंत, रवी दिवा, तेजेंद्र पोटे यांनी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे शालेय सुट्ट्यांचा सदुपयोग करत तीन बाल सदस्यांनीही श्रमदानात भाग घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपले मोलाचे योगदान दिले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनविभागाचे आरएफओ मयूर सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.