ठाणे: ‘एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर लेखकाला निश्चितच प्रोत्साहन मिळते. मात्र खरा पुरस्कार, प्रोत्साहन वाचकांच्या प्रतिक्रियांमधूनच मिळते, ’असे मनोगत पुरस्कारप्राप्त तरुण लेखकांनी शनिवारी व्यक्त केले. त्याच वेळी पुरस्कारांकडे गांभीर्याने आणि जबाबदारीने बघण्याची गरज असल्याचे मतही या लेखकांनी मांडले.
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’अंतर्गत गडकरी रंगायतनच्या कट्ट्यावर शनिवारी ‘पुरस्कारानंतरचे लिखाण’ या विषयावरील संवादसत्र पार पडले. त्यात साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक प्रदीप कोकरे, प्रणव सखदेव आणि कवी पवन नालट हे सहभागी झाले होते. ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ मुख्य उपसंपादक लता दाभोळकर यांनी या तिघांशी संवाद साधला.
एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर लेखकाला निश्चितच प्रोत्साहन मिळते. परंतु, पुरस्काराकडे गांभीर्याने आणि जबाबदारीने बघितले पाहिजे, यापूर्वी समाजमाध्यमातून आलेल्या प्रतिक्रियांमुळे पुरस्कारांबद्दल मी नकारात्मक झालो होतो. परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर माझी कादंबरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्यानंतर यवतमाळमधील एका महिलेकडून मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे पुरस्काराविषयीचा माझा समज बदलला. सामान्य माणसांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया हाच खरा पुरस्कार असतो, असे मत कोकरे यांनी मांडले.
प्रणव सखदेव यांनी वाल्मीकी रामायणाचे उदाहरण देऊन ती कथा वाल्मीकींना कशी सुचली असेल याचा विचार करून मलाही लिखाणाची प्रेरणा मिळाली असे सांगितले. जेव्हा एखादा राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळतो. तेव्हा आपल्याला मान्यता प्राप्त होते. तसेच आपण महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचतो. हे पुरस्कार मिळाल्यानंतर मला जाणवल्याचे कवी पवन नालट यांनी सांगितले.
सध्याचा काळ कवितेसाठी वाईट
कविता लिहिताना नेणिवेचा आणि जाणिवेचा संयोग लागतो. परंतु, सध्या समाजमाध्यमांवरील कविता फारच उथळ आणि प्रतिक्रियावादी असल्याचे दिसते, असे, मत प्रणव सखदेव यांनी मांडले. कवितेतून स्वत:चा ठसा उमटला पाहिजे पण अलीकडे कवितांमधून तसे दिसून येत नाही. हल्लीच्या पिढीचे वाचन कमी झाल्यामुळे समाजमाध्यमातून कट्टरता आधी व्यक्त होते, असे मत पवन नालट यांनी व्यक्त केले.
तरुण वाचकांत कादंबरी वाचण्याचे प्रमाण अधिक असून ते लेखकाच्या एक पाऊल पुढे विचार करताना दिसत आहेत, असे मत प्रदीप कोकरे यांनी मांडले. एखाद्या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दडपण येत असल्याची भावना प्रणव सखदेव यांनी व्यक्त केली.
