ठाणे : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाने त्याच्याच मित्राच्या कानाला चावा घेऊन कानाची पाळी तोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जखमी तरुण वर्तकनगर भागातील रहिवासी आहे. त्याची मैत्रिण घोडबंदर भागात राहण्यास आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तरुणाने तिची भेट घेण्याचे ठरविले होते. २५ फेब्रुवारीला तो कामे आटोपून तिच्या घरी गेला. तिच्याच इमारतीमध्ये तरुणाचा एक मित्र राहतो. त्यालाही तरुणाने तिच्या घरी बोलावले होते. तो तरुण आल्यानंतर पहाटे पर्यंत तिघांच्या गप्पा सुरू होत्या. अचानक दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून त्याने तरुणाच्या कानाचा चावा घेतला. त्यावेळी तरुणाच्या कानाची पाळी तुटून पडली. चावा घेतल्यानंतर तरुण तेथून निघून गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी तरुणाच्या कानातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याने कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तरुणावर प्राथमिक उपचार करुन त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे उपचार घेतल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी डाॅक्टरांनी खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तरुणाने याप्रकरणी कासारवडवली पोलिसांकडे जबाब नोंदविल्यानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.