कल्याण : कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून चाललेल्या एका तरूणाने पत्रकार सुरेश काटे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत काटे यांच्या हाताला दुखापत झाली. आपण दुचाकी शांतपणे चालवा, असा सल्ला काटे यांनी त्या तरूणाला देताच, तरूणाने दादागिरीची भाषा करत शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, ज्येष्ठ शिवसैनिक नितीन माने यांच्या प्रतिमा पत्रकार काटे यांना दाखवत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली.

तु माझ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली आहे. यात मला दुखापत झाली आहे आणि तुच मला पुन्हा शिवागाळ मारण्याची धमकी देत आहेस, असे पत्रकार काटे यांनी दुचाकीवरील त्या तरूणाला सांगितले. पण, तरूण काही ऐकण्यास तयार नव्हता. तो दादागिरीची भाषा करत होता. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आणि कल्याण मधील ज्येष्ठ शिवसैनिक नितीन माने यांच्या प्रतिमा पाहताच, पत्रकार सुरेश काटे यांनी त्या तरूणाला तु आत्ताच जिल्हाप्रमुख लांडगे आणि माने यांना संपर्क कर आणि आपण पत्रकार काटे यांच्याशी वाद घालत आहोत असे सांग, असे सुचविले. पण तरूण तेही ऐकण्यास तयार नव्हता.

अखेर पत्रकार काटे यांनी तात्काळ पोलीस आणि वाहतूक पोलिसांना या तरूणाने रस्त्यावर चालविलेल्या धिंगाण्या विषयी कळविले. तात्काळ पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या घटनेची दखल घेतली. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्यांनी घटनास्थळी पाठविले. याशिवाय वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आहे. हे प्रकरण शांत करण्यासाठी एक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाला. पण तरूण काहीही ऐकण्यास तयार नव्हता.

पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तरूण दुचाकीवर दोन तरूणींना बसवून निघून गेला. काटे त्याला घटनास्थळी थांंबून राहण्याची सूचना करत होते. पण तो नंतर बिथरला आणि निघून गेला. घडल्या घटनेची पत्रकार काटे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तरूणाच्या दुचाकीच्या वाहन क्रमांकावरून पोलिसांनी त्याची माहिती काढली आहे. आणि त्याचा तपास सुरू केला आहे. या तरूणाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहेत.

गेल्या वर्षी डोंबिवलीत महात्मा फुले रस्त्यावर चार पत्रकारांना शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या प्रकरणाची उपायुक्त अतुल झेंडे यांनी स्वता दखल घेऊन मारहाण करणाऱ्या दादाभाईला लाठीचा प्रसाद देऊन त्याचा लोकांसमोर जाहीर कार्यक्रम केला होता. आणि त्याला भर रस्त्यात उठाबशा काढण्यास भाग पाडले होते. कल्याण, डोंबिवलीत गल्लीबोळात अनेक दादाभाई तयार झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे आणि ज्येष्ठ शिवसैनिक नितीन माने यांनी त्या तरूणाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हल्ली कोणीही कोणत्याही नेते, मंत्री यांची प्रतिमा खिशात ठेवतो आणि वावरतो, त्यातला हा प्रकार आहे.